दिल्लीकरांच्या मनात ‘केजरीवाल’ : १५ वर्षांनंतर भाजपचं कमळ MCD मधून सत्तेबाहेर

नवी दिल्ली : देशभराचं लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाने तब्बल १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाची चव चाखायला लावली आहे. तसंच सलग तीन विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका निवडणुकीतही दिल्लीमध्ये ‘केजरीवाल’ यांच्याच नावाचा करिश्मा कायम असल्याचं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:55 AM • 07 Dec 2022

follow google news

नवी दिल्ली : देशभराचं लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाने तब्बल १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाची चव चाखायला लावली आहे. तसंच सलग तीन विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका निवडणुकीतही दिल्लीमध्ये ‘केजरीवाल’ यांच्याच नावाचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

कोणाला किती जागा मिळाल्या?

महानगरपालिका निवडणुकीत २५० जागांपैकी आम आदमी पक्षाने तब्बल १३४ जागांवर विजय नोंदविला. तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपला १०४ जागा जिंकण्यात यश आलं आहे. त्याचवेळी काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठतानाही दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसला अवघ्या ९ जागांवर यश मिळालं आहे. इतरांनी ३ जागा जिंकल्या आहेत.

१५ वर्षांचा गड खालसा :

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाची चव चाखायला लावली आहे. महापालिकेमध्ये २००७ पासून भाजप बहुमताने सत्तेत होती. सध्या दिल्लीमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपकडे आहेत. तर आम आदमी पक्षाने सगल तीनवेळा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती :

दिल्ली महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दोन डझन केंद्रीय मंत्री आणि अनेक आमदार, खासदार यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपविण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, हा मोठा विजय आहे. दिल्लीच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन. शाळा, रुग्णालये यांना चांगल्या अवस्थेमध्ये आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत केली. दिल्लीच्या लोकांनी आता त्यांच्या मुलाला आणि भावाला आशीर्वाद दिला. आज दिल्लीच्या जनतेने दिल्ली स्वच्छ करण्याची जबाबदारी दिली आहे. दिल्लीतील जनतेचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.

    follow whatsapp