Nashik Crime : त्र्यंबकेश्वर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात त्र्यंबकेश्वर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. भंगार गोळा करून उपजीविका करणाऱ्या महिलेने जवळीक साधण्यास नकार दिल्याच्या रागातून एका नराधमाने तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल संदीपजवळ 23 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता एका अनोळखी महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून येत होतं. प्राथमिक पाहणीत दगडाने हल्ला करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृत महिलेची ओळख पटवणं आणि आरोपीचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली. मृतदेहावरील कपडे, अंदाजे वय आणि वर्णनाच्या आधारे गुप्त बातमीदारांच्या मदतीने परिसरात चौकशी सुरू करण्यात आली.
हेही वाचा : आहिल्यानगर: रेल्वे ट्रॅकवरुन जाताना युवक मोबाईलवर बोलण्यात मग्न, तितक्यात गोवा एक्सप्रेस आली अन् चिरडून गेली
तपासादरम्यान मृत महिला ही भंगार आणि प्लास्टिक गोळा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्यासोबत राहणाऱ्या चांगुणा देतराम भगरे हिच्याकडे चौकशी केली असता मृत महिलेचं नाव झुनकाबाई सीताराम वाघ (वय 52, रा. ब्राम्हणवाडे) असल्याचं स्पष्ट झालं. चौकशीत चांगुणा भगरे हिने सांगितलं की तिचा मुलगा पांडुरंग देवराम भगरे (वय 35) हाही भंगार गोळा करण्याचं काम करतो आणि तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन पांडुरंग उर्फ गोविंद देवराम भगरे (रा. सामुंडी, सध्या राहणार त्र्यंबकेश्वर) याला ताब्यात घेतलं.
सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत झुनकाबाई ही काही दिवसांपासून आरोपी व त्याच्या आईसोबत भंगार गोळा करून विक्री करत होती. तिघांनाही मद्यपानाचं व्यसन असून भंगार विक्रीतून मिळालेल्या पैशातून दारू पिण्यात येत होती. 23 डिसेंबरच्या रात्री आरोपी दारूच्या नशेत असताना त्याने झुनकाबाईशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने तीव्र विरोध केल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचं उघड झालं. या प्रकरणात पांडुरंग भगरे याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











