Ahilyanagar Railway Accident, राहुरी (जि. अहिल्यानगर) : मोबाईलवर सुरू असलेल्या संभाषणात इतका गुंतलेला की आपण नेमके कुठे चाललो आहोत, याचेही भान राहिले नाही. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना क्षणभरातच समोरून वेगाने आलेल्या गोवा एक्सप्रेसने धडक दिली आणि एका निष्पाप जीवाचा अंत झाला. राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (दि. 27) सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
या अपघातात दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६, रा. तांदूळवाडी, ता. राहुरी) यांचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय हे सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ते चालताना पूर्णपणे फोनकडे लक्ष देऊन बोलत होते. याच दरम्यान ते अनवधानाने रेल्वे रुळावर आले, मात्र त्यांना याची जाणीवच झाली नाही.
याच वेळी गोव्याच्या दिशेने जाणारी गोवा एक्सप्रेस प्रचंड वेगाने त्या मार्गावरून येत होती. इंजिन चालकाने हॉर्न वाजवून इशारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईलवरील संभाषणात मग्न असलेल्या दत्तात्रय यांच्या लक्षात हा इशारा आला नाही. काही क्षणांतच रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह राहुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दत्तात्रय चव्हाण हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या अचानक जाण्याने तांदूळवाडी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा परिवार आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे दुर्दैवी उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे रुळ ओलांडताना किंवा त्यावरून चालताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. क्षणिक निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेने मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर आणि सार्वजनिक ठिकाणी असावधान वागण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लातूर हादरलं, दारु -सिगारेट फुकट न दिल्याचा राग, बार मालकाला जागेवर संपवलं; जाताना विदेशी दारु पळवली
ADVERTISEMENT











