लातूर हादरलं, दारु -सिगारेट फुकट न दिल्याचा राग, बार मालकाला जागेवर संपवलं; जाताना विदेशी दारु पळवली
Latur Crime : नायगाव–मुळकी–उमरगा मार्गावर नायगाव शिवारात गजानन नामदेव कासले (वय 42) यांचे बिअर बार अँड रेस्टॉरंट आहे. शुक्रवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेले तीन जण हॉटेलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी दारू आणि सिगारेटची मागणी केली. मात्र, फुकट देण्यास गजानन कासले यांनी नकार दिला. यामुळे तिघेही आक्रमक झाले आणि त्यांनी शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूर हादरलं, दारु -सिगारेट फुकट न दिल्याचा राग
बार मालकाला जागेवर संपवलं; जाताना विदेशी दारु पळवली
Latur Crime, लातूर : चाकूर तालुक्यातील नायगाव परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. बिअर बार व रेस्टॉरंटमध्ये दारू आणि सिगारेट फुकट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन अज्ञात व्यक्तींनी हॉटेल चालकासह एका कामगारावर काठीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कामगार गंभीर जखमी झाला आहे.
नायगाव–मुळकी–उमरगा मार्गावर नायगाव शिवारात गजानन नामदेव कासले (वय 42) यांचे बिअर बार अँड रेस्टॉरंट आहे. शुक्रवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेले तीन जण हॉटेलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी दारू आणि सिगारेटची मागणी केली. मात्र, फुकट देण्यास गजानन कासले यांनी नकार दिला. यामुळे तिघेही आक्रमक झाले आणि त्यांनी शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.
वाद वाढताच आरोपींनी अचानक काठ्यांनी हल्ला चढवला. गजानन कासले यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की कासले हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी हॉटेलमध्ये काम करणारे अजय भरत मोरे (वय 28, रा. अजनी, ता. अहमदपूर) हेही मध्ये पडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. अजय मोरे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर आरोपींचा हिंसक प्रकार इतक्यावरच थांबला नाही. त्यांनी हॉटेलमधील टीव्हीची तोडफोड केली. तसेच गल्ल्यात ठेवलेले अंदाजे 10 ते 15 हजार रुपयांचे रोख पैसे आणि विदेशी दारूच्या बाटल्या चोरून ते घटनास्थळावरून पसार झाले. ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिस तपासाला वेग देण्यात आला आहे.










