Dharashiv News : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. शेतातील बोअरची बिघडलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना क्रेनचा कप्पा थेट उच्चदाब विद्युत वाहिनीवर कोसळला. या दुर्घटनेत काम करत असलेल्या चौघांना जोरदार विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील बाप-लेकांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
ADVERTISEMENT
या दुर्घटनेत शेतकरी नागनाथ काशीनाथ साखरे (वय 56) आणि त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे (वय 30) यांचा मृत्यू झाला. तसेच मजुरीसाठी आलेले काशिम कोंडाजी फुलारी (वय 47) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा रतन काशिम फुलारी (वय 16) यांचाही या अपघातात जीव गेला. एकाच ठिकाणी दोन बाप-लेकांचा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागनाथ साखरे यांच्या शेतातून दोन्ही बाजूंनी उच्चदाब विद्युत वाहिनी गेलेली आहे. याच शेतातील बोअरची मोटार बिघडल्याने ती बाहेर काढण्यासाठी शनिवारी दुपारी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू होते. चौघेही क्रेनच्या कप्प्यावर उभे राहून मोटार काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कप्पा खाली पडून अधिक नुकसान होऊ नये, यासाठी चौघांनी तो सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणातच कप्पा जवळच असलेल्या उच्चदाब वाहिनीवर आदळला. त्यातून मोठा विद्युत प्रवाह उतरल्याने चौघांनाही तीव्र शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच केशेगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे, पोलीस कर्मचारी एस. ए. कोळी तसेच महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रतीक खापरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्घटनेत काशिम फुलारी यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांना दोन मुले असून, त्यातील एक मुलगा गतिमंद आहे. दुसरा मुलगा रतन फुलारी हा इयत्ता दहावीत शिकत होता. शनिवारी शाळेला अर्धी सुटी असल्याने वडिलांना मदत करण्यासाठी तो साखरे यांच्या शेतात गेला होता. मात्र, मदतीसाठी गेलेला मुलगा वडिलांसोबतच मृत्युमुखी पडला. फुलारी कुटुंबात आता कमावणारा कोणीही उरलेला नाही.
दरम्यान, नागनाथ साखरे यांच्या कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामलिंग साखरे यांचे लग्न झालेले असून त्यांना दोन लहान मुले व पत्नी आहे. संसार नव्याने उभा राहत असतानाच रामलिंग यांचा अकाली मृत्यू झाल्याने साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातामुळे केशेगाव परिसरात शोककळा पसरली असून, शेतातील कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नेकी का काम, आंदेकरका नाम! गुंड बंडू आंदेकरची घोषणाबाजी, तोंडावर फडकं बांधून भरला उमेदवारी अर्ज
ADVERTISEMENT











