नेकी का काम, आंदेकरका नाम! गुंड बंडू आंदेकरची घोषणाबाजी, तोंडावर फडकं बांधून भरला उमेदवारी अर्ज
Pune Mahanagar Palika Election : “नेकी का काम आंदेकरका नाम”, “आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत”, “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही” अशा घोषणा देत बंडू आंदेकरने स्वतःची प्रतिमा वेगळी दाखवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेकी का काम, आंदेकरका नाम! गुंड बंडू आंदेकरची घोषणाबाजी
तोंडावर फडकं बांधून भरला उमेदवारी अर्ज
Pune Mahanagar Palika Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत गँगवॉर, गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या झालेल्या प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने केलेली घोषणाबाजी चर्चेचा विषय ठरली.
“नेकी का काम आंदेकरका नाम”, “आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत”, “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही” अशा घोषणा देत बंडू आंदेकरने स्वतःची प्रतिमा वेगळी दाखवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनुसार कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास मनाई असतानाही, घोषणांचे हे दृश्य अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले. अर्ज दाखल करताना बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी तोंडावर स्कार्फ किंवा फडकं बांधले होते.
पुण्यातील भवानी पेठ येथील विभागीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आंदेकर टोळीचे सदस्य कडक पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणण्यात आले. या दोघी कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होत्या. न्यायालयाने काही अटी व शर्तींसह त्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी परवानगी दिल्यानंतर, पोलिसांच्या गराड्यात त्यांना पुण्यात आणण्यात आले.










