Latur News : निलंगा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असून, या थंड हवामानाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावरही बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच एका दुर्दैवी घटनेत गुरुवारी सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या 45 वर्षीय ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबुलगा बु (ता. निलंगा) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गावावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
विकास विश्वासराव कुलकर्णी (वय 45, रा. अंबुलगा बु) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. कुलकर्णी हे आपल्या कर्तव्यदक्ष कामासाठी परिचित होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. बुधवारी रात्री ते कामानिमित्त बाहेरून आपल्या मूळ गावी अंबुलगा बु येथे मुक्कामी आले होते.
नेहमीप्रमाणे आरोग्याची काळजी घेत गुरुवारी पहाटेच कुलकर्णी हे व्यायामासाठी घराबाहेर पडले. निलंगा–तोगरी मार्गाने ते आपल्या शेताच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला थांबून व्यायाम करत होते. मात्र, अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. काही क्षणातच त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि ते रस्त्याच्या कडेला कोसळले.
ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कुलकर्णी यांना त्वरित निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थितांमध्ये शोककळा पसरली.
कुलकर्णी यांच्या आकस्मिक निधनाने अंबुलगा बु गावासह निलंगा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक जबाबदार अधिकारी, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारा ग्रामसेवक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान, सध्या वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी, सकाळी लवकर व्यायाम करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. विशेषतः मध्यमवयीन आणि उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी थंडीत व्यायाम करताना सतर्क राहावे, असा सल्लाही दिला जात आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











