Ratnagiri Crime: रत्नागिरीत एका महिलेचा घरातील बाथरूममध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेचा मुलगा मध्यरात्री लघुशंकेसाठी उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत महिलेचा लहान मुलगा अचानक रात्री उठल्यानंतर त्याला बाजूला आई दिसली नाही आणि नंतर त्याने त्याच्या आजीला उठवलं. दरम्यान, महिलेचा शोध घेतला असता घराबाहेरील एका बाथरूममध्ये तिचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सापडल्याची माहिती आहे. या घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मुलगा लघुशंकेसाठी उठला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 डिसेंबर) च्या रात्री ही घटना उघडकीस आली. पीडितेचं नाव अक्षरा मोहिते असून रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून त्या घरात झोपल्या. दरम्यान, पहाटे जवळपास 4:15 वाजताच्या सुमारास कुटुंबातील सगळेच सदस्य गाढ झोपेत असताना पीडितेच्या लहान मुलगा आलोक लघुशंकेसाठी उठला आणि त्याने आपल्या आईला हाक दिली. पण, त्याची आई त्याला बिछान्यावर कुठेच दिसली नाही. त्यानंतर, त्याने त्याच्या आईला म्हणजेच वडिलांच्या मावशीला उठवलं आणि आई घरात नसल्याचं सांगितलं.
हे ही वाचा: प्रेयसीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला... हत्येमागचं नेमकं कारण काय?
कुटुंबियांनी पीडितेचा शोध घेतला पण...
मुलगा आणि त्याची आजी ताराबाई शिंदे यांनी अक्षरा मोहिते यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बराच वेळ, घरात शोधाशोध केल्यानंतर पीडिता सापडली नसल्याने शेजारी राहणाऱ्या दत्ताराम तुकाराम मोहिते नावाच्या मुलाच्या काकांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, काकांसोबत मिळून महिलेचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. शोध घेत असतानाच घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. महिलेला अशा अवस्थेत पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, तपासादरम्यान, डॉक्टरांनी अक्षरा यांना मृत घोषित केलं.
हे ही वाचा: कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कोणत्या प्रभागाची होतेय चर्चा?
अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
त्यानंतर, देवरुख पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती आणि स्थानिकांच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 194 अन्वये आकस्ममिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











