जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?', तिघांनी मिळून केला एकाचा खून

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 12:14 PM)

Jamkhed Crime News : ‘आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?’ या कारणावरून तिघांनी मिळून चाकू व काठीने मारहाण करत तुकाराम सुर्यभान काळे (वय 50, रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?'

point

तिघांनी मिळून केला एकाचा खून

जामखेड :  जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे किरकोळ वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?’ या कारणावरून तिघांनी मिळून चाकू व काठीने मारहाण करत तुकाराम सुर्यभान काळे (वय 50, रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी वैभव एकनाथ काळे याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल तुकाराम काळे (वय 25, व्यवसाय – मजुरी, रा. फक्राबाद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फक्राबाद गावच्या शिवारातील झोपडपट्टी परिसरात आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे आणि तुळसाबाई एकनाथ काळे (सर्व रा. फक्राबाद) यांनी त्यांच्या वडिलांवर हल्ला केला. राहुल काळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आरोपी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी “तुम्ही कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?” असा जाब विचारत शिवीगाळ केली व “तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी दिली होती. त्यानंतर वाद मिटल्याने तक्रार देण्यात आली नव्हती.

हेही वाचा : यवतमाळ: शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केल्याचा आरोप... भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास बबन लोंढे यांनी राहुल काळे यांना माहिती दिली की, त्यांच्या वडिलांना झोपडपट्टी परिसरात मारहाण सुरू आहे. ही माहिती मिळताच राहुल व त्यांचा भाऊ दिगांबर घटनास्थळी धावले. तेथे त्यांनी पाहिले असता, सागर एकनाथ काळे व वैभव एकनाथ काळे हे दोघे चाकूने तुकाराम काळे यांच्यावर वार करत होते, तर तुळसाबाई एकनाथ काळे काठीने मारहाण करत होती. आरोपींनी डोक्यावर व खांद्यावर चाकूने वार केल्याने तुकाराम काळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता व ते बेशुद्ध अवस्थेत होते. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना येताना पाहून आरोपी वाहनावर बसून पसार झाले. त्यानंतर तुकाराम काळे यांना तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेद्वारे जामखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२६ नोंदवण्यात आला असून कलम १०३(१), ३५२, ३५१ अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी वैभव एकनाथ काळे याला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट; IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्... घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते