nashik earthquake update : नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा एकामागून एक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. रात्री 10 वाजल्यानंतर दिंडोरी, निफाड, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून नाशिक शहरापासून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भानवड गावाच्या जवळ असल्याची माहिती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही नागरिकांनी रात्र घराबाहेरच काढली. पुन्हा भूकंपाचा धक्का बसून घरांची पडझड होण्याची भीती नागरिकांच्या मनात होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विद्यार्थिनीवर शिक्षकाने केला बलात्कार, वडिलांना पाठवले अश्लील फोटो, पुढं काय घडलं?
घरांच्या भिंतींची पडझड, अनेक तालुक्यात सौम्य धक्के
पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये तीनपेक्षा जास्त वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील शेवटचा धक्का तुलनेने अधिक तीव्र होता. या धक्क्यांनंतर ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना हादरे बसले असून घरांना तडे गेल्याची माहिती आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली असून घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची किंवा कोणाला इजा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपाचे केंद्र दिंडोरी तालुक्यात असल्याने भानवड गावाच्या आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने रात्री परिसरात गर्दी झाल्याचेही दिसून आले.
हेही वाचा : Govt Jobs : भारतीय विमान प्राधिकरणात नोकरीची संधी, वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
लिफ्टमध्ये धक्के जाणवल्यानंतर लोकं प्रचंड घाबरले
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये काही लोक लिफ्टमधून वर जात असताना भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे दिसत आहे. लिफ्टमध्ये असलेल्या लोकांना एकामागून एक धक्के जाणवल्यानंतर त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली. एका महिलाही या घटनेमुळे घाबरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र सुदैवाने लिफ्टमध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. लिफ्ट वर पोहोचल्यानंतर दरवाजा उघडताच सर्वजण बाहेर पडले. भूकंपानंतर नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले असून अनेकांनी घरात जाणे टाळले.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच हे भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपामागील कारणाबाबतही माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे डॉक्टर अजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे हायड्रोसिस्मिक म्हणजेच जलभूकंपीय कारण असू शकते. जून महिन्यापासून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून सपाट पठारी भागांसह पर्वतरांगांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीखालील बेसॉल्ट खडकांच्या भेगांमध्ये पाणी खोलवर झिरपले. यामुळे खडकांमधील द्रव पदार्थाचा दाब म्हणजेच फ्लुईड पोर प्रेशर वाढला. परिणामी दख्खनच्या पठाराखालील प्राचीन भूगर्भीय भेगांमध्ये हालचाल झाली आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT












