Govt Jobs : भारतीय विमान प्राधिकरणात नोकरीची संधी, वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विविध पदांसाठी भरती सुरु केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे. यासाठी निकष काय आहेत, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय विमान प्राधिकरणात नोकरीची संधी
वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
AAI Recruitment : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) व्यवस्थापक (मॅनेजर) आणि कनिष्ठ कार्यकारी (ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह) या श्रेणीतील विविध विषयांच्या 389 पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट पासून सुरू झाली असून, उमेदवारांना 7 सप्टेंबर पर्यंत प्राधिकरणाच्या www.aai.aero या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. या सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया संगणकावर आधारित परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीअंतर्गत मॅनेजर आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या दोन्ही स्तरांवर विविध शाखांमधील पदे भरली जाणार आहेत. मॅनेजर पदांसाठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आयटी, आर्किटेक्चर, फायर), एमबीए, सीए, किंवा कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे, तसेच या पदांसाठी 3 वर्षांचा व्यावसायिक अनुभव अनिवार्य आहे. दुसरीकडे, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (वित्त, कायदा, ऑपरेशन्स, सर्व्हे अँड कार्टोग्राफी) या पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असून, या पदांकरिता कोणत्याही अनुभवाची अट नाही.
हे ही वाचा : दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार, भाजी विक्रेता फरार
वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी जाहीर केली आहे. मॅनेजर (ग्रुप-ए, E-3 स्तर) पदासाठी रु. 60,000 ते 1,80,000 ही वेतनश्रेणी असून उमेदवारांना वार्षिक सुमारे 21 लाख रुपयांचे उत्पन्न (CTC) मिळेल. तर ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (ग्रुप-बी, E-1 स्तर) पदासाठी रु. 40,000 ते 1,40,000 या वेतनश्रेणीनुसार वार्षिक सुमारे 14 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती ठिकाण भारतामध्ये कुठेही असू शकते.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबई 3.0 चा मास्टर प्लॅन तयार करणार परदेशी कंपनी, कसं असेल नवं शहर?
परीक्षा कधी होणार?
अर्जाच्या शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (एनसीएल) वर्गातील पुरुष उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD), महिला उमेदवार आणि 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले एएआय (AAI) मधील शिकाऊ उमेदवार (Apprentices) यांना या अर्जाच्या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. संगणकावर आधारित परीक्षेची (CBT) तारीख लवकरच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर घोषित केली जाणार असल्याने इच्छुकांनी मुदतीपूर्वी त्वरित अर्ज करावा.
