Beed Nagarpalika Election : बीड नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर संत नामदेवनगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘तुझी भावजय नगरसेवक पदी कशी काय निवडून आली?’ असा सवाल करत एका तरुणाने धारदार कोयता हातात घेऊन घरासमोर दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
बीड नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक 14 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आरती बनसोडे या नगरसेवकपदी निवडून आल्या. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत नामदेवनगर येथे राहणाऱ्या आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कौशल्य अनिल मस्के हा घराच्या गेटसमोर धारदार कोयता घेऊन आला. त्याने मोठमोठ्याने आरडाओरड सुरू करत ‘तुझी भावजय नगरसेवक कशी काय निवडून आली?’ असा जाब विचारला. यावेळी तो प्रचंड आक्रमक झाला होता. कोयता हवेत फिरवत त्याने घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींची तोडफोड केली. दुचाकींच्या सीटवर कोयत्याने वार करत त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले. यासोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या घटनेची तक्रार आनंता देवीदास बनसोडे (वय 35, व्यवसाय मजुरी, रा. संत नामदेवनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, आरोपी कौशल्य मस्के हा मागील काही महिन्यांपासून दारूच्या नशेत येऊन किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व धमकावत करत होता. भीतीपोटी यापूर्वी त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आलेली नव्हती.
21 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. घराबाहेर आरडाओरड सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिले असता आरोपी कोयता घेऊन उभा असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे निवडणुकीनंतरच्या वातावरणात तणाव निर्माण झाला असून, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं? नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT











