Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, नेमकं काय घडलं याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
प्राप्त माहितीनुसार, जवळा येथील लखे कुटुंबातील दोन मुलांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर काही वेळातच त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. एका कुटुंबातील चार सदस्यांचा एकाच वेळी झालेला मृत्यू ही घटना अत्यंत धक्कादायक असून, नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे कारण अस्पष्ट असून , आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे. सद्या जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असुन वरिष्ठ अधिकारी गावात दाखल झाले. 22 वर्षीय बजरंग रमेश लखे, 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावाची मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली येत आत्महत्या केली. त्यांचे वडील 51 वर्षीय रमेश होनाजी लखे , आई 44 वर्षीय राधाबाई रमेश लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लखे कुटूंबात हे चार जणच होते. संपूर्ण कुटूंब या घटनेमुळे समाप्त झाले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. सामाजिक कार्यातही उमेशचा होता सक्रिय सहभाग होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली.
रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याच दरम्यान, मुलांच्या पालकांशी संपर्क होऊ न शकल्याने पोलिस आणि ग्रामस्थांनी त्यांच्या घरी पाहणी केली असता, आई आणि वडील दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला.
हेही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कुटुंबीयांचे नातेवाईक, शेजारी आणि गावकऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि अलीकडील घडामोडींची माहिती गोळा केली जात आहे.
या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. आई-वडिलांचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार आहे की त्यामागे काही घातपात आहे, याबाबत पोलीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का? याचीही चौकशी सुरू आहे.
जवळा गावात ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण असून, नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा अंत होणे हे अत्यंत वेदनादायक असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान, पोलीस तपासातून लवकरच या घटनेचे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











