Kidney Sale racket Case : राज्यातील किडनी विक्री प्रकरण दिवसेंदिवस अधिक धक्कादायक वळण घेत असून, एका तरुणाने प्रेयसीचं परदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवयव तस्करीचं मोठं जाळं उघडकीस आलं आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या हिमांशू भारद्वाज याच्या पोलिस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली असून, अद्याप तिसरा आरोपी फरार आहे.
ADVERTISEMENT
हिमांशू भारद्वाज हा मूळचा चंदीगडचा रहिवासी असून तो ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ नावाचा व्यवसाय चालवत होता. त्याची प्रेयसी अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पाहत होती. तिच्या शिक्षण, प्रवास आणि राहण्याचा सर्व खर्च भारद्वाजच उचलत होता. मात्र, व्यवसायात तोटा सुरू झाल्यानंतर त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भारद्वाजने सुरुवातीला वेगवेगळ्या मार्गांनी पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. या दरम्यान तो सोशल मीडियावरील ‘किडनी डोनर कम्युनिटी’ नावाच्या फेसबुक ग्रुपच्या संपर्कात आला. या ग्रुपच्या माध्यमातून त्याने स्वतःची किडनी विकण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि प्रेयसीचा खर्च भागवण्यासाठी त्याने हा मार्ग स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली.
किडनी विकल्यानंतर केवळ इथेच प्रकरण थांबले नाही. आर्थिक व्यवहार आणि संपर्क वाढत गेल्यानंतर भारद्वाज हळूहळू या अवयव तस्करी रॅकेटचा सक्रिय भाग बनला. पुढे तो स्वतःच अशा ग्रुपचा प्रशासक बनून गरजू लोकांना ‘डोनर’ आणि ‘रिसिपिएंट’शी जोडण्याचं काम करू लागल्याचंही तपासात समोर आलं आहे. शुक्रवारी चंद्रपूर येथे भारद्वाजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्याची एक किडनी नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र, त्याने केवळ एकदाच कंबोडियाला प्रवास केल्याचं सांगितलं असून, पासपोर्टवरील व्हिसा नोंदीही त्यास दुजोरा देतात. त्यामुळे नेमकी किडनी कुठे, कधी आणि कोणत्या रुग्णालयात काढण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणात रामकृष्ण मल्लेश्याम सुंचू हे नावही चर्चेत आले आहे. त्याच्याकडे बंगळुरूमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, सोलापुरात मोठी जमीन, हैदराबादमध्ये हॉटेल आणि सोलापुरातील अशोक चौक भागात पतसंस्था असल्याची माहिती आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेला रामकृष्ण अनेक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या कचाट्यात सापडून किडनी विकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर हे संपूर्ण रॅकेट प्रकाशझोतात आले. या प्रकरणामुळे अवयव तस्करीचं गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आलं असून, पोलिस तपासातून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











