मुंबईकरांना युती, आघाडीत नाही इंटरेस्ट... 'ही' एकच गोष्ट पलटवणार सगळा गेम, उमेदवारांची झोप उडवणारा 'तो' सर्व्हे!
मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी मागील काही वर्षात वॉर्डमध्ये केलेले काम हे गेमचेंजर ठरणार आहे. असेंडियाने केलेल्या सर्व्हेत मतदारांनी याच मुद्द्याला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर असेंडिया या कंपनीने मुंबईतील विविध समाजघटकांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये मतदारांना युती, आघाडी, हिंदुत्व, मराठी भाषा यापेक्षाही एक मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतोय. तो म्हणजे त्यांच्या प्रभागातील 'नगरसेवकाने मागील टर्ममध्ये केलेले काम.' या गोष्टीला मुंबईकर सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. या सर्व्हेमध्ये महिलांपासून मुस्लिम आणि मुंबईतील मराठी माणसांचा समावेश करण्यात आला असून, विकास आणि इतर मुद्द्यांबाबतही मतदारांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व्हे मुंबईतील राजकीय वातावरणाला नवे वळण देणारे ठरू शकते, ज्यात पारंपरिक घटकांऐवजी व्यावहारिक मुद्दे पुढे येत आहेत.
असेंडिया कंपनीने मुंबईतील महत्वाच्या राजकीय प्रश्नांवर हा सर्व्हे केला असून, मतदारांना 'मतदान करताना तुम्ही कोणता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवून मतदान कराल?' असा प्रश्न विचारण्यात आला. सर्व्हेमध्ये चार मुख्य गटांची मतं विचारात घेण्यात आली.
महिला (Mahila), मुस्लिम (Muslim), मराठी माणूस (Marathi Manoos) आणि इतर (Others - गुजराती, उत्तर आणि दक्षिण भारतीय इ.) या चारही गटांमधील सर्व मतदारांनी एकाच मुद्द्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. ती म्हणजे आपल्या प्रभागात नगरसेवकाने केलेलं काम. सर्व गटातील लोकांनी या मुद्द्याला 45% ते 52% इतके प्राधान्य दिले आहे. हे दर्शवते की, मुंबईकर मतदार आता स्थानिक पातळीवरील कामगिरीला अधिक महत्व देत आहेत.
सर्व्हेच्या मुख्य निष्कर्ष:
1. नगरसेवकाने केलेले काम (Work done by Corporator): हा मुद्दा सर्व गटांमध्ये अव्वल आहे. या मुद्द्याला महिलांनी 45%, मुस्लीम मतदारांनी 47%, मराठी मतदारांनी 52% आणि इतर गटांमधील मतदारांनी 45% मत दिलं आहे. याचा अर्थ असा की, मुंबईतील मतदार आता निवडणुकीत इतर मुद्द्यांपेक्षाही नगरसेवकांच्या मागील कामगिरीवर आधारित निर्णय घेणार आहेत. मराठी मतदार तर याच मुद्द्यावर त्यांच्या नगरसेवकाला पसंती देऊ शकतात. कारण 52 मराठी मतदारांना त्यांच्या नगरसेवकाने केलेलं काम हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं.










