ADVERTISEMENT
Beed Crime , रोहिदास हातागळे / बीड : केज तालुक्यातील एका गावात विधवा महिलेवर शेतात बोलावून घेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाजीपाला देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला एकट्या ठिकाणी बोलावून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 57 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विधवा असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करून आपले जीवन जगत आहे. परिसरातीलच मधुकर उर्फ मदन मस्के (वय 57) याने आपल्या शेतात भाजीपाला तयार झाल्याचे सांगत तो घेऊन जाण्यासाठी तिला बोलावले होते. ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेत महिलेला शेतात बोलावून घेण्यात आले. मात्र, तेथे गेल्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेल्या प्रकारानंतर मानसिक धक्का बसला असतानाही पीडित महिलेने धैर्य दाखवत थेट युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. तिने संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर कथन केला. महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विलंब न करता तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच आरोपी मधुकर मस्के याला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे संबंधित गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटना थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विशेषतः एकट्या, विधवा किंवा असुरक्षित महिलांना लक्ष्य करून गुन्हे केल्याचे प्रकार वाढत असल्याने सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
युसुफ वडगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच इतर आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांकडून सक्षम पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, अशा घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा होऊन समाजात कडक संदेश जावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











