नागपुरातील उड्डाणपूल दुर्घटनेला कोण जबाबदार?; वरिष्ठ अधिकारी म्हणतात…

मुंबई तक

• 10:20 AM • 20 Oct 2021

-योगेश पांडे नागपूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या उड्डाण पुलाचा मोठा भाग शनिवारी कोसळला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली, तरी घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई होणार का? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यासंदर्भात ‘मुंबई तक’ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली. […]

Mumbaitak
follow google news

-योगेश पांडे

हे वाचलं का?

नागपूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या उड्डाण पुलाचा मोठा भाग शनिवारी कोसळला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली, तरी घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई होणार का? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यासंदर्भात ‘मुंबई तक’ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली.

मंगळवारी रात्री नागपुरातील पारडी परिसरातील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा मोठा भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पूल कोसळल्याच्या कारणांची चर्चा शहरभर सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे.

लवकरच समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल यांनी सांगितले की, ‘या संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी सुरू झालेली आहे. चौकशीमधून काय समोर येते ते बघुन मग दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. ही घटना कशामुळे घडली ते नेमकं कारण आता सांगता येणार नाही’, असंही अग्रवाल म्हणाले.

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे निर्माण करण्यात येत असलेला पार्टी उड्डाणपुलाचा निर्माणाधीन भाग मंगळवारी रात्री अचानक कोसळल्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी सुरू केली आहे. नागपुरातील व्हीएनआयटी आणि नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या दिल्ली मुख्यालयातील टीम या घटनेचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असून, जर कंत्राटदार दोषी आढळला तर कठोर कारवाई करण्यात येईल’, असं राजीव अग्रवाल यांनी सांगितले.

पूलाचे काम कासवगतीने

पूर्व नागपुरातील पारडी उड्डाणपुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. हे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. ऑगस्ट 2014 मध्ये पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले होते. जून 2016 मध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तब्बल 22 महिने काम सुरू व्हायलाच लागले. जून 2019 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन ठरलेली होती, परंतु आतापर्यंत फक्त 40 टक्केच काम पूर्ण झालेलं आहे. शहरातील कळमना, पूर्व वर्धमान नगर, सीए रोड, भंडारा रोड, रिंग रोड असा भाग या उड्डाणपूलाला जोडण्यात येणार आहे.

    follow whatsapp