काश्मीरचे आझाद केवळ काँग्रेसच्या ओळखीवर तीनदा महाराष्ट्रातून निवडून गेले…

मुंबई तक

• 09:19 AM • 26 Aug 2022

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सर्व पदांसहित पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आझाद मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेस आणि पक्षनेतृत्वावर नाराज होते. ते काँग्रेसमधील G23 गटामध्येही सहभागी होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहिले आहे. […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सर्व पदांसहित पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आझाद मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेस आणि पक्षनेतृत्वावर नाराज होते. ते काँग्रेसमधील G23 गटामध्येही सहभागी होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहिले आहे. सध्याचं काँग्रेस रिमोटवर चालणारे आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हे वाचलं का?

गुलाम नबी आझाद यांचं महाराष्ट्र कनेक्शन

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसमधील एक मोठे नाव मानले जाते. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना अगदी तळापासून पक्ष संघटनेत काम करुन त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पक्षातील जेष्ठ नेते असा प्रवास पूर्ण केला. आझाद यांच्या काँग्रेसमधील जवळपास 51 वर्षांच्या या राजकारणाला आज जरी पूर्णविराम मिळाला असला तरीही त्यांच्या राजकीय यशात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. कारण आझाद यांच्या संसदीय राजकारणाची सुरुवातच मुळात महाराष्ट्रातून झाली होती.

गुलाम नबी आझादांचं डिपॉझिटही झालं होतं

आझाद हे मुळचे जम्मू-काश्मीरमधील भलेसा गावचे. आधी कॉलेजमधील राजकारण, नंतर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीचे सचिव असे त्यांचे काम सुरु असतानाच ते काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांच्या संपर्कात आले. संजय गांधी यांच्या तरुणांच्या राजकारणाच्या वर्तुळात आझाद फिट बसले. आझाद थेट राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पुढे 1977 मध्ये संजय गांधी यांनी आझाद यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव बनवले. आझाद यांना त्याचवर्षी इंदेरवाला मतदारसंघातून विधानसभेचे देखील तिकीट देण्यात आले होते. मात्र ते त्यात पराभूत झाले. इतकेच नाही तर आझाद यांचे त्यात डिपॉझिट देखील जप्त झाले.

1980 साली संजय गांधी यांनी आझाद यांच्या नावाचा लोकसभेसाठी विचार सुरु केला. मात्र काश्मीरमधून त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याने त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरु केला. त्याचवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वाशिमचे तत्कालिन खासदार वसंतराव नाईक यांचे निधन झाले होते. काँग्रेससाठी हा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ होता. नाईक यांनी या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. संजय गांधी यांनी आझाद यांच्यासाठी हाच मतदारसंघ अंतिम केला. आझाद यांना महाराष्ट्रातील वाशिम मतदारसंघातून तिकीट मिळाले. आझाद यांनी या मतदारसंघातून जवळपास 1 लाख 51 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळविला.

वाशिम मतदारसंघ आणि गुलाम नबी आझाद

पुढे 1982 साली आझाद इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. 1984 साली देखील आझाद याच मतदारसंघातून निवडून गेले. 1990 मध्ये आझाद पुन्हा महाराष्ट्रातूनच राज्यभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या काळात ते जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेवर निवडून येत गेले. अनेकदा ते केंद्रीय मंत्री झाले. संसदेतील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. या दरम्यानच्या काळात 2005 साली ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही झाले. त्यामुळेच आझाद यांनी आज जरी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी ऐकेकाळी त्यांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीसाठी महाराष्ट्र लाभदायी ठरला होता असेच म्हणावे लागेल.

    follow whatsapp