Uddhav Thackeray : महाराष्ट्रासह देशात पुढच्या दारानेच आणीबाणी आणण्याची तयारी

मुंबई तक

15 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:34 AM)

आम्ही म्हणू तोच निवाडा, आम्ही म्हणू तेच लिहायचं असं जर धोरण राज्यात राबवलं जात असेल तर मागच्या दाराने नाही तर पुढच्या दारानेच आणीबाणी आणण्याची तयारी सुरू आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खूप वेळ म्हणजेच १५ मिनिटं दिली. त्या १५ मिनिटात वेगळं […]

Mumbaitak
follow google news

आम्ही म्हणू तोच निवाडा, आम्ही म्हणू तेच लिहायचं असं जर धोरण राज्यात राबवलं जात असेल तर मागच्या दाराने नाही तर पुढच्या दारानेच आणीबाणी आणण्याची तयारी सुरू आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खूप वेळ म्हणजेच १५ मिनिटं दिली. त्या १५ मिनिटात वेगळं काय केलं? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

हे वाचलं का?

कर्नाटक सीमा प्रश्न अनेक दिवसांपासून कोर्टात प्रलंबित

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो निकाल लागेपर्यंत फक्त महाराष्ट्रानेच थांबायचं आहे का? आजपर्यंत जेव्हा जेव्हा हा प्रश्न चिघळला तेव्हा तो कर्नाटकच्या बाजूने चिघळला आहे महाराष्ट्राच्या बाजूने नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरे, अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.

अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत सीमा प्रश्नी नवीन काय ठराव झाला तो काही कळला नाही. ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या जुन्याच आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

फ्रॅक्चर्ड फ्रिडमच्या वादावर काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

समिती नेमली जाते तेव्हा समितीच्या मताचा आदर केला पाहिजे. पुस्तक न वाचता पुरस्कार दिले कसे जातात? तसंच पुरस्कार जाहीर केल्यानंतर तो मागे कसा घेतला जातो? असा प्रश्न त्यांनी फ्रॅक्चर्ड फ्रिडम पुस्तकावरून उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात सरकार बदललं त्यानंतर अनेक केसेस मागे घेतल्या जात आहेत. मधल्या काळात केंद्र सरकारचे कायदा मंत्री न्यायमूर्तींच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. न्याय व्यवस्थेने आम्ही म्हणू तोच न्याय, आम्ही म्हणू तेच लिहायचं, आम्ही म्हणू तेच छापायचं असं जर धोरण असेल तर आणीबाणी पुढच्याच दाराने आणण्याची तयारी सुरू आहे असं मी म्हणेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मोर्चाची तयारी व्यवस्थित झाली आहे. महाराष्ट्र प्रेमींना आम्ही आवाहन करतो आहोत जागे व्हा आणि ठामपणे उभे राहा. ज्यांना महाराष्ट्राबद्दल मनात प्रेम आहे त्यांनी अभूतपूर्व मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp