समीर वानखेडेंना झटका! न्यायालय म्हणाले ‘आभाळ कोसळणार आहे का?’

विद्या

• 05:01 PM • 22 Feb 2022

भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरु रेस्तराँ […]

Mumbaitak
follow google news

भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले.

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरु रेस्तराँ आणि बारचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. फसवणूक आणि खोटी माहिती देऊन परवाना घेण्यात आल्याचा आरोप वानखेंडेवर आहे. याप्रकरणात वानखेडेंविरुद्ध ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात झाला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, तसेच बार परवाना पुन्हा सुरू (पूर्ववत) करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जमादार यांनी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सांगत सुनावणीस नकार दिला. तसेच याचिकेची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं.

आभाळ कोसळणार आहे का?; न्यायालय संतापले

समीर वानखेडे यांच्या याचिकेबद्दल न्यायाधीशांसमोर सोमवारी कोणताही उल्लेख केलेला नव्हता. मात्र, अचानक याचिका सुनावणीस घेण्यात आल्यानंतर न्यायालयाला संताप अनावर झाला.

न्यायमूर्ती पटेल म्हणाले, “ही याचिका सुनावणीच्या यादीमध्ये कशी काय समाविष्ट करण्यात आली? सोमवारी आमच्यासमोर या याचिकेबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. आम्ही याला परवानगीच दिलेली नाही.”

न्यायमूर्ती पटेल यांच्याबरोबरच न्यायमूर्ती जमादार यांनीही यावर खडेबोल सुनावले. “एक गरीब व्यक्ती याचिका दाखल करते तेव्हा त्यांची याचिका सुनावणीसाठी घेतली जात नाही. एक प्रभावशाली व्यक्ती याचिका दाखल करते आणि तिची याचिका तत्काळ सुनावणीसाठी यादीत समाविष्ट केली जाते. इतकी पटकन सुनावणी घेण्यासारखं इतकं गंभीर काय आहे? कोणतं आभाळ कोसळणार आहे,” असा सवाल उच्च न्यायालयाने केला.

याचिकेच्या सुनावणीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देत न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

वानखेडेंची उद्या चौकशी

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर समीर वानखेडेंविरूद्ध ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातच ठाणे पोलिसांनी आता समीर वानखेडेंना समन्स बजावलं आहे. २३ फेब्रुवारी रोजी कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हजर न राहिल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. समीर वानखेडे यांच्याविरुद्ध षडयंत्र, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    follow whatsapp