RJ केराबाई सरगर कशा झाल्या रेडिओ जॉकी?

इम्तियाज मुजावर

• 02:36 PM • 16 Feb 2021

1998 पासून माणदेशकरांना रेडिओकडे खेचून आणणा-या आणि हम भी किसी से कम नहीं, असं प्रत्येक तरुणाला ठणकाउन सांगणा-या आरजे केराबाई सरगर यांचा आवाज म्हणजे सातारकरांचं प्रेम. साताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या लोकगीतांचे कार्यक्रम सादर […]

Mumbaitak
follow google news

1998 पासून माणदेशकरांना रेडिओकडे खेचून आणणा-या आणि हम भी किसी से कम नहीं, असं प्रत्येक तरुणाला ठणकाउन सांगणा-या आरजे केराबाई सरगर यांचा आवाज म्हणजे सातारकरांचं प्रेम.

हे वाचलं का?

साताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात. लहानपणापासून आई आणि आजीची जात्यावरची गाणी ऐकल्याने आज रेडिओ शो करू शकत असल्याचं त्या सांगतात.

एका छोट्याशा गावापासून सुरू झालेला प्रवास माणदेशी तरंग रेडिओ स्टेशनपर्यंत कसा पोहोचला यावर त्या म्हणतात, आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता. तो पुण्यातून आणला होता. त्याच्यावर मी सकाळ संध्याकाळ गाणी ऐकायचे. तो ऐकायला लागल्यावर, आपणही पुणे केंद्रावर किंवा सागली केंद्रावर जावं असं सारखं माझ्या मनात यायचं. त्यासाठी मी मुलाकडे हट्टही करायचे, केराबाई सांगतात. पण माणदेशी तरंगमध्ये पोहोचण्याचं खरं श्रेय त्या आपल्या मुलालाच देतात. मुलाचं म्हणजे संतोषचं म्हसवडमध्ये रोज येणं जाणं होतं. म्हसवडला त्याने माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र सुरू झाल्याचा बोर्ड वाचला होता. त्यामुळे त्यानेच मला रेडिओ स्टेशनमध्ये पहिल्यांदा नेलं आणि प्रवास सुरू झाला तो आज गेली 15 वर्षं सुरू आहे, असं त्या सांगतात.

केराबाई शिकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गाण्यासाठी त्यांच्या घरातल्यांची मोठी मदत त्यांना मिळते. त्यांचे पती, मुलं, नातवंड त्यांना पुस्तकातली गाणी, कविता वाचून दाखवतात. त्या ऐकूनच त्या पाठ करतात. अनेकदा तर एखादं पुस्तक वाचून दाखवल्यावर त्या ते ऐकून जात्यावरच्या ओव्या तयार करतात. म्हणूनच सातारकरांना आणि म्हसवडकरांना त्यांचं विशेष कौतूक वाटतं. महाराष्ट्रातही निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती, गप्पांचे कार्यक्रम वरचेवर होत असतात. ते पाहून नातवंडांनाही आजी सारखं मोठं व्हावसं वाटतं असं त्यांची सून शितल सरगर आवर्जून सांगते.

खरंतर आपणही रेडिओ जॉकीच्या खुर्चीत दिमाखात बसावं, असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटून गेलेलं असतं. पण सगळ्यांचंच काही हे स्वप्नं पूर्ण होत नाही. पण अशात एका छोट्याशा गावात राहणारी एक बाई तिचं हे स्वप्न फक्त पूर्ण तर करतेच, शिवाय तब्बल 15 वर्षं ते जगते. एज इस जस्ट अ नंबर, हे खरं करून दाखवते. लिहिता वाचता येत नसतानाही फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हजारोंशी संवाद साधून त्यांच्या मनात घर करते, हे सगळंच कमाल आहे म्हणूनच आज त्यांच्या घरच्यांना, गावक-यांना त्यांचा अभिमान आहे.

    follow whatsapp