Haryana election commission on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ‘H Files’ या पत्रकार परिषदेद्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीत “मतचोरी” झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. हरियाणातील दोन कोटी मतदारांपैकी सुमारे 25 लाख मतदार बनावट आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी मतदार यादींतील फोटो दाखवत केला आहे. शिवाय, प्रत्येक 8 मतामागे 1 मत चोरीला गेल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी यासाठी मतदार यादीतील काही फोटो शेअर करत अनेक पुरावे सादर केले, ज्यात एका व्यक्तीचा फोटो एकच असून नाव मात्र वेगवेगळ्या मतदारांचे असल्याचे दिसले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर आता हरियाणा निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे. आयोगाने राहुल गांधींचे दावे निराधार असल्याचे सांगत “X” वर एक पोस्ट केली असून त्यात 15 मुद्द्यांमध्ये मतदार यादी कशी तयार करण्यात आली याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; विवाहितेला क्रूरपणे संपवलं
हरियाणा निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण :
1. 2 ऑगस्ट 2024 रोजी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आणि ती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
2. SSR दरम्यान एकूण 4,16,408 दावे आणि आक्षेप प्राप्त झाले.
3. बीएलओ (BLO) ची एकूण संख्या – 20,629
4. अंतिम मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करून सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली.
5. जिल्हाधिकारींकडे ईआरओ विरोधात एकही अपील दाखल झाले नाही.
6. जिल्हाधिकारींच्या आदेशाविरोधात सीईओकडेही दुसरे अपील दाखल झाले नाही.
7. नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात आली आणि ती 16 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांना देण्यात आली.
8. मतदान केंद्रांची एकूण संख्या – 20,632
9. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या – 1,031
10. सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या पोलिंग एजंट्सची संख्या – 85,790
11. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तपासणीवेळी उमेदवारांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नव्हता.
12. मतमोजणीसाठी उमेदवारांनी नियुक्त केलेल्या एजंट्सची संख्या – 10,180
13. मतमोजणीदरम्यान अधिकाऱ्यांना मिळालेल्या तक्रारी किंवा आक्षेपांची संख्या – 5
14. निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यात आला.
15. निवडणुकीला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची संख्या – 23
हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांकडून कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता. तसेच आयोगाने सर्व कामे पारदर्शकपणे केली असून, सर्व आवश्यक माहिती प्रत्येक राजकीय पक्षासोबत शेअर करण्यात आली होती, असं हरियाणाच्या निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.
राहुल गांधींच्या आरोपावर अभय चौटाला यांची प्रतिक्रिया
दरम्यान, हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदल (INLD) पक्षाचे अध्यक्ष अभय चौटाला यांनी म्हटले की, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष स्वतःचं स्वत:चं अपयश लपवण्यासाठी असे आरोप करत आहेत. ही काँग्रेसची जुनी सवय आहे. राहुल गांधी कोणते आरोप करत आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे, पण ते ज्या प्रकारे सैन्याबद्दल बोलत आहेत ते अतिशय लज्जास्पद आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











