Ajit Pawar Death : राज्याने अर्थमंत्री गमावला तर राष्ट्रवादीने पक्षाचा प्रमुख; अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राने काय गमावलं?

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वयाच्या 66 व्या वर्षी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील एक कणखर, प्रशासनावर पकड असणारा, जनसामान्यांसाठी झटणारा नेता गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याचे राज्यातील राजकारणावर काय परिणाम होतील, जाणून घेऊया.

Ajit Pawar Death

Ajit Pawar Death

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 04:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्याने अर्थमंत्री गमावला तर राष्ट्रवादीने पक्षाचा प्रमुख

point

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राने काय गमावलं?

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वयाच्या 66 व्या वर्षी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील एक कणखर, प्रशासनावर पकड असणारा, जनसामान्यांसाठी झटणारा नेता गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याचे राज्यातील राजकारणावर काय परिणाम होतील, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ajit Pawar Death : दाट धुकं, लो व्हिजिबलिटी आणि... अजितदादांचं विमान कोसळलं तेव्हाची सगळी क्रोनोलॉजी जशीच्या तशी!

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावणारे नेते अजित पवार हे 8 वेळा आमदार आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले होते. इतकेच नाही तर महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते अर्थमंत्री होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता संतुलनासाठी त्यांना सोबत घेतले होते. आता अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.

अजित पवारांच्या पक्षाची संसदेतील ताकद

अजित पवारांचा दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत राजकीय दबदबा होता. संसदेत सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. लोकसभेत एक खासदार असून राज्यसभेत त्यांच्या पक्षाचे तीन खासदार आहेत. लोकसभेत सुनील तटकरे हे खासदार आहेत; तर प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार आणि नितीन लक्ष्मणराव जाधव हे राज्यसभेचे खासदार आहेत.

अजित पवारांच्या पक्षाचा केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष राजकीय महत्त्व आहे. त्यांच्या कोट्यातून मोदी सरकारमध्ये कोणीही मंत्री नसले, तरी राज्यसभा आणि लोकसभेत त्यांची मोठी ताकद आहे. यामुळेच मोदी सरकारमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. राज्यसभेत सरकारची अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करुन घेण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, त्याहूनही मोठी ताकद त्यांची महाराष्ट्र विधानसभेत आहे.

विधानसभेतील अजित पवारांच्या पक्षाची ताकद

महाराष्ट्र विधानसभेत अजित पवारांचे स्वतंत्र राजकीय महत्त्व राहिले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचे 40 आमदार उरले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 सदस्यांपैकी भाजपचे 132, शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवारांच्या पक्षाचे 41 आमदार होते. महायुतीसाठी अजित पवार हे मोठी राजकीय ताकद मानले जायचे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवले होते. बारामतीमध्ये 'सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा' असा राजकीय संघर्ष झाला. यामध्ये सुप्रिया सुळे यांचे पारडे जड ठरले आणि सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव अजित पवारांसाठी मोठा धक्का होता. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा झेप घेतली आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे यश मिळवले.

हे ही वाचा :  Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली, न पाहावणारी दृश्य

विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वर्चस्व

केवळ विधानसभा आणि लोकसभेतच नव्हे, तर विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अजित पवारांचा मोठा राजकीय दबदबा होता. विधान परिषदेत त्यांच्या राष्ट्रवादीचे 9 आमदार आहेत. अशा प्रकारे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. अनेक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर अजित पवारांच्या पक्षाचा ताबा आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे 167 नगरसेवक निवडून आले आहेत. 37 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्षपद त्यांच्या पक्षाकडे आहे. पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10  नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये त्यांचे अध्यक्ष आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेत 3, ठाण्यात 9, जळगावमध्ये 1, कोल्हापूरमध्ये 4, परभणीत 4, पुण्यात 27, नागपुरात 1 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 नगरसेवक आहेत. मात्र अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण 360 अंशात बदलणार, अशी चर्चा आहे.

शिंदेसोबत सत्ता संतुलनासाठी फडणवीसांनी घेतले सोबत

अजित पवारांनी आपले खासदार आणि आमदार यांच्या जोरावर स्वतःची राजकीय शक्ती टिकवून ठेवली होती. त्यांनी केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा दिला होता, तर महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते सहभागी होते. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी भाजपची युती झाली, तेव्हा भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करावी लागली होती. एकनाथ शिंदेंसोबत सत्ता संतुलन राखण्यासाठीच फडणीसांनी अजित पवारांना आपल्यासोबत घेतले होते. 

अजित पवारांना आपल्यासोबत घेऊन फडणवीसांनी केवळ शिंदेंच्या 'प्रेशर पॉलिटिक्स'वर नियंत्रण मिळवले नव्हते, तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्रीपद पुन्हा आपल्याकडे मिळवले. हे सर्व भाजपला अजित पवारांच्या मदतीनेच करणे शक्य झाले, कारण राष्ट्रवादीकडे 41 आमदारांचे बळ होते. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असण्यासोबतच एक प्रभावी नेते होते. त्यांच्या मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक हे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

    follow whatsapp