Ajit Pawar Death : '...आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे वेदनादायी' श्रीनिवास पाटील हळहळले

 Ajit Pawar death : माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दु:खदायक आहे. अजितदादांना मी लहानपणापासून पहात आलो असून सामान्य कार्यकर्त्याचे वटवृक्षात रूपांतर होताना आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे हे अतिशय वेदनादायी आहे.'

 Ajit Pawar death

 Ajit Pawar death

मुंबई तक

• 01:59 PM • 28 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे वेदनादायी

point

श्रीनिवास पाटील हळहळले

 Ajit Pawar death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांच्या बद्दल माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. हा धक्का पचवणं कठीण असल्याचं म्हणत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ajit Pawar Death : 'जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते..' अजित पवारांबद्दल राज ठाकरेंची भावूक पोस्ट

काय म्हणाले श्रीनिवास पाटील?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दु:खदायक आहे. अजितदादांना मी लहानपणापासून पहात आलो असून सामान्य कार्यकर्त्याचे वटवृक्षात रूपांतर होताना आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे हे अतिशय वेदनादायी आहे. त्यांचे वडील अनंतराव पवार हे माझे स्नेही होते. १९५८ सालापासून पवार कुटुंबीयांच्या घरी माझे येणे - जाणे असल्याने अजितदादांना त्यांच्या जन्मापासून, लहानपणापासून अगदी जवळून पाहत आलो आहे. 

त्यांच्या शालेय जीवनापासून ते एक उमदा कार्यकर्ता म्हणून सुरुवात होत असताना मी पुण्याचा कलेक्टर होतो. तेव्हा ते नेहमी तळमळीने बारामती भागातील कामे करून घेण्यासाठी माझ्याकडे येत असत. त्यानंतर ते बारामती लोकसभेचे खासदार आणि मी पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचा आयुक्त होतो. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या काळात मी प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही एकत्र काम केले आहे. त्यानंतरही ते आमदार, राज्यमंत्री आणि मी प्रशासकीय अधिकारी असे समीकरण राहिले होते. त्यांची प्रशासनातील पकड, काम करण्याची हातोटी आणि वाढत चाललेले प्रशासकीय कौशल्य पाहून आम्हाला अतिशय आनंद होत असे. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पदापर्यंत गवसणी घातली याचाही अभिमान होता. 

हे ही वाचा : Ajit Pawar Death: अजितदादांचं विमान क्रॅश होताच बनलं फायर बॉल, Crash Site चे अत्यंत भयंकर Photos

सबंध महाराष्ट्र व महाराष्ट्रातील प्रश्न त्यांनी अभ्यासले होते. तळागाळातील प्रश्नांची जाण असणारे असे हे नेतृत्व गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर झालेच आहे, त्याचबरोबर पवार कुटुंबाचे नुकसान झाले आहे आणि त्याच कुटुंबाचा भाग असल्याने आमचे नुकसान झाले आहे. राजकीय प्रवास काही असला तरी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री असा वाढत चाललेला त्यांचा वकूब पाहून त्यांचा नेहमी अभिमान वाटायचा. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व होते. ग्रामपातळीपासून ते राज्याच्या शासन स्तरावर त्यांनी जनतेच्या विकासासाठी काम केले. सार्वजनिक जीवनात कार्यरत राहण्याची त्यांची ऊर्मी लक्ष वेधून घेणारी होती. सहकार, राजकारण, समाजकारणात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांची निर्णायक आणि स्पष्टवक्तेपणाची शैली सर्वांना परिचित होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मन हेलावून गेलं आहे. त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, आपुलकी आणि आमच्या कुटुंबियाप्रति असलेला जिव्हाळा कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावलं आहे. हा धक्का पचवणं कठीण असून पवार कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली.
 

    follow whatsapp