सचिन वाझे सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भाजपचा?-शिवसेना

मुंबई तक

• 03:09 AM • 03 Jun 2022

अनिल देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार असल्याची घोषणा सीबीआयने केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझेला सीबीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात शिवसेनेने (Shiv Sena) मात्र या प्रकरणी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात भाजपवर […]

Mumbaitak
follow google news

अनिल देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार असल्याची घोषणा सीबीआयने केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझेला सीबीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात शिवसेनेने (Shiv Sena) मात्र या प्रकरणी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात भाजपवर शेलक्या शब्दांमध्ये शरसंधान करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे म्हणे माफीचा साक्षीदार होणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष म्हणजेच भाजपने वाझेप्रकरणी केलेला शिमगा विसरता येणार नाही. वाझे म्हणजे वसुली, भ्रष्टाचार असे नामाभिदान बनले आहे. वाझे हा भ्रष्टाचार, वसुली, खून या प्रकरणांतला आरोपी आहे. बडतर्फ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा हस्तक म्हणून तो पोलीस खात्यात काम करत होता.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे या जोडीने खाकीचा गैरवापर करून जे उद्योग केले त्यामुळे देशभरातल्या पोलिसांची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्राची बदनामी झालीच, मात्र संपूर्ण पोलीस दलास कलंक लागला. अशा वाझेला सीबीआयने राजकीय फायद्या तोट्यासाठी माफीचा साक्षीदार करावं हे नीतीमत्तेला धरून नाही.

अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ गाडीमध्ये स्फोटकं ठेवून वाझे याने आधी सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे सूत्रधार वाझे आणि परमबीर सिंह आहेत. परमबीर सिंह यांना केंद्राने आणि कोर्टाने या प्रकरणात सरळ अभय दिलं, आता परमबीर यांचा हस्तक सचिन वाझेलाही माफीचा साक्षीदार केलं जातं आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप लावला. पण आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. तरीही सीबीआय आणि ईडीने देशमुख यांच्या घरावर दोनशेवेळा धाडी घातल्या.

आता अनिल देशमुख तुरुंगात आहेत आणि परमबीर सिंग करूनसवरून मोकळे आहेत.

वाझेलाही अभय मिळतं आहे. यालाच कायद्याचं राज्य म्हणायचं का? सीबीआयसराखी केंद्रीय संस्था सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करते आहे हा साधासुधा प्रकार नाही. मनसुख हिरेन हा जवळचा मित्र असतानाही परमबीर सिंग यांच्या बचावासाठी मनसुख हिरेनची हत्या घडवली. अशा वाझेला सीबीआय आता माफीचा साक्षीदार बनवत आहे. वाझेवर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. इतक्या भयंकर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवता येत नाही. वाझेला माफीचा साक्षीदार करणं म्हणजे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करण्यासारखंच आहे, कायद्याला हे अपेक्षित नाही.

सगळ्यात खोटारडा गुन्हेगार आता माफीचा साक्षीदार बनून काय खरे सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भाजपचा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रश्न सचिन वाझेचा नसून नैतिकतेचा आहे. आज भाजपमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माफीचे साक्षीदार बनून घुसले आहेत आणि शांत झोपले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याने ईडीचा त्रास वाचला हे हर्षवर्धन पाटील यांनी मान्यच केलं आहे. नारायण राणे आणि त्यांच्या पोराबाळांच्या बोगस कंपन्यांचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर येताच हे महाशयही भाजपचे माफीचे साक्षीदार झाले. महाराष्ट्रात मंगळसूत्र चोरांच्या टोळीपासून अनेक वाल्या शुद्ध शुचिर्भूत होण्यासाठी माफीचे साक्षीदार झाले आणि भाजपने त्यांना पवित्र करून घेतले. आता सचिन वाझे हा देखील उद्या भाजपवासी झाला तर आश्चर्य वाटायला नको.

    follow whatsapp