– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी
ADVERTISEMENT
आपल्या मुलावर कोणत्याही प्रकारचं संकट कोसळलं तर आई सर्वकाही विसरुन त्याच्या रक्षणासाठी पुढे येते. याचाच प्रत्यय कल्याणमध्ये आला आहे. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला इतर प्रवाशांच्या मदतीने शोधून काढत आईने तब्बल १२ तास आरोपीला पकडून ठेवलं. कल्याण रेल्वे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत इटारसी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
उत्तर प्रदेशातील भदोई येथून एक महिला आपली आई आणि दोन मुलींसह गोरखपूर-दादर एक्सप्रेसमध्ये चढली. या महिलेचा पती बदलापूरमध्ये राहतो तर ही महिला कल्याण स्टेशनला उतरणार होती. पीडित मुलीसोबत असलेलं कुटुंब जनरल बोगीतून प्रवास करत होतं. १५ फेब्रुवारीला पहाटे साडेचार वाजल्याच्या दरम्यान ही गाडी मध्य प्रदेशातील तिमारानी रेल्वे स्थानकात आली असता आरोपी सोनू प्रजापतीने पीडित मुलीवर शारिरिक अत्याचार केले.
यावेळी डब्यात असलेले सर्व प्रवासी व मुलीची आई झोपेत होती. सकाळी सर्वांना जाग आल्यानंतर मुलगी रडत असल्याचं पाहून आईने चौकशी केली असता तिने घडलेला प्रसार सांगितला. आरोपी त्याच डब्यात असल्याचं लक्षात येताच आईने इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडलं. प्रवाशांपासून वाचण्यासाठी आरोपी रेल्वेच्या टॉयलेटमध्ये जाऊन लपला. परंतू तोपर्यंत प्रवाशांच्या रौद्र रुपामुळे आरोपीला माघार घ्यावीच लागली. पीडित मुलीच्या आईने या घटनेबद्दल आपल्या पतीला कल्पना दिली.
‘माझ्यावर बलात्कार केला, न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही द्यायाचा’, 10 वीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या
पीडित मुलीच्या वडिलांनी यानंतर तात्काळ कल्याण रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनीही औरंगाबाद आणि इगतपुरीमध्ये कंट्रोल रुमला सुचना देऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सांगितलं. परंतू पोलीस अधिकारी वेळेत पोहचू न शकल्यामुळे दोन्ही स्टेशनवरुन गाडी सुटली. अखेरीस कल्याण रेल्वे पोलिसांनीच या आरोपीला ताब्यात घेण्याचं ठरवलं. परंतू यादरम्यान १२ तासांच्या कालावधीत आईने हा आरोपी पळून जाणार नाही याची काळजी घेतली. गाडी कल्याण रेल्वे स्थानकात दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. यानंतर आरोपीचा ताबा इटारसी रेल्वे पोलिसांकडे देण्यात आला असून त्याच्यावर POCSO आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतापजनक! शिवसेना आमदाराकडून महिलेला रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
ADVERTISEMENT











