महाराष्ट्रातले प्रसिद्ध लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा रशियातल्या मॉस्कोमध्ये उभारला जातो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ सप्टेंबरला रशियातल्या मॉस्कोमध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT
रशियात का उभारण्यात आला अण्णा भाऊ साठेंचा पुतळा?
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे अवघे दीड दिवस शाळेत गेले होते. त्यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव अण्णा भाऊ साठेंवर होता. रशियात लेनिनने केलेल्या कामगारांच्या क्रांतीमुळे ते भारावून गेले होते. अशीच क्रांती त्यांना भारतात घडवायची होती. त्यामुळेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात कामगार, दलित आणि उपेक्षित लोकांना केंद्र स्थान होतं. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या कथा कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळेच रशियात त्यांची लोकप्रियता वाढली. हेच कारण आहे की मॉस्कोत त्यांचा पुतळा उभारला जातो आहे.
भारत आणि रशिया यांच्यातल्या संबंधांना ७५ वर्षे पूर्ण
भारत आणि रशिया यांच्यातल्या राजकीय संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळेच रशियात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. रूडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी मॉस्को या ठिकाणी १४ आणि १५ सप्टेंबरला ही परिषद होणार आहे. रूडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररीनेच हा पुतळा उभारला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
“लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा रशियात उभारला गेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मुंबई विद्यापीठ आणि रशिया सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे. मी आणि राहुल नार्वेकर या कार्यक्रमासाठी जात आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच रशियाला पोहचल्याचं ट्विटही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
अण्णा भाऊ साठे हे पहिल्यांदा काँ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांनी प्रभावित झाले. १९४४ मध्ये अण्णा भाऊ साठे यांनी दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत लालबावटा कला पथक स्थापन केलं. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिलं होतं.
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा या कादंबरीला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णा भाऊ साठेंनी १५ लघुकथा संग्रहही लिहिले. तसंच रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि पोवाडे लिहिले. पोवाडा आणि लावणी या साहित्य प्रकारांमुळे ते लोकप्रिय झाले. तसंच त्यांचं कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहण्यास मदत झाली.
ADVERTISEMENT
