Who is Riyaz Bhati: कोण आहे रियाझ भाटी, काय आहे दाऊदशी कथित लिंक? नवाब मलिक-फडणवीसांमध्ये जुंपली

दिव्येश सिंह

• 09:42 AM • 10 Nov 2021

मुंबई: महाराष्ट्रातील ड्रग्स प्रकरणाबाबत सुरू झालेलं राजकारण आता थेट अंडरवर्ल्ड लिंकपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्यांमध्ये रियाझ भाटी (Riyaz Bhati) हे नवीन […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील ड्रग्स प्रकरणाबाबत सुरू झालेलं राजकारण आता थेट अंडरवर्ल्ड लिंकपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्यांमध्ये रियाझ भाटी (Riyaz Bhati) हे नवीन नाव चर्चेत आले आहे.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांनी फडणवीस यांचा रियाझसोबतच्या नेमका संबंध काय? असा प्रश्न विचारुन राष्ट्रवादीने रियाझचे भाजप नेत्यांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

त्याच वेळी आता भाजपने देखील पलटवार करत रियाझ भाटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता हा रियाझ भाटी नेमका कोण असा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात रियाझ भाटी आहे तरी कोण?

कोण आहे गँगस्टर रियाज भाटी?

रियाज भाटी हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध आहे. असा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. भाटी याच्यावर खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टच्या सहाय्याने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली होती.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याविरुद्ध जुलैमध्ये गोरेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात भाटी हा सहआरोपी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेच्या सांगण्यावरून भाटी हा बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळून वाझेला देत असे. याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने सप्टेंबरमध्ये रद्द केला होता. तेव्हापासून तो फरार असून या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस त्याच्या अटकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत आहेत.

फेब्रुवारी 2020 मध्ये, भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जामीनासंदर्भातील आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रोखण्यात आलं होतं. यावेळी तो सौदी अरेबियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी 2015 मध्येही त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. भाटीला पोलिसांनी 2013 मध्ये अटकही केली होती. तो बनावट पासपोर्टद्वारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

2006 मध्ये त्याच्यावर मालाडमध्ये जमीन हडप आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दाऊद इब्राहिम टोळीशी असलेले संबंध वापरून त्याने जमीन ताब्यात घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. खंडाळ्यातही त्याच्यावर गोळीबार आणि धमकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

नवाब मलिकांनी रियाझ भाटीसंदर्भात फडणवीसांवर नेमके काय आरोप केले आहेत:

‘देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, रियाज भाटी कोण आहे? तो बनावट पासपोर्टसह पकडला गेला होता. तो दाऊद इब्राहिमचा खास माणूस आहे. हाच रियाज भाटी डबल पासपोर्टसह पकडला गेला होता. पण अवघ्या दोन दिवसात तो सुटला. खरं तर तो भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसायचा. एवढंच नव्हे तर फडणवीसांच्या डिनर टेबलवर देखील त्यांच्या सोबत होता.’

‘यापुढे जाऊन मी सांगतो की, मला पंतप्रधानांवर आरोप करायचे नाहीत. पण तो देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा पोहचला. पंतप्रधांनाकडे जाण्याआधी संबंधित व्यक्तीची संपूर्ण तयारी होते. अशावेळी तो थेट पंतप्रधानांना भेटून त्यांच्यासोबत फोटो कसा काय काढू शकतो?’ असे अनेक गंभीर सवाल मलिकांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

Ashish Shelar: ‘नवाब मलिकजी जावयाच्या प्रेमापोटी राजकारणाच्या नीच पातळीला जाऊ नका’, शेलारांची घणाघाती टीका

रियाझ भाटीबाबत आशिष शेलारांचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

‘नवाब मलिक यांनी रियाज भाटीचा उल्लेख केला. आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाज भाटी यांचा काहीही संबंध, संपर्क नाही. फोटोवरुनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी दाखवणार नव्हतो पण मग हे सगळे फोटो पाहाच..’ (शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत रियाज भाटीचे फोटो असल्याचे शेलारांनी दाखवले)

‘मला वाटतं कोणाचीही नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करु नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर चार बोटं तुमच्याकडे येतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी यांचा रियाज भाटीशी काहीही संबंध नाही.’ असंही आशिष शेलार यावेळी म्हणाले.

‘किंबहुना क्रिकेटच्या राजकारणात त्याला राजाश्रय कोणी दिला हे जगजाहीर आहे पण कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेऊन आरोप करण्याची आमची प्रथा परंपरा नाही. त्यामुळे आम्ही ते करणार नाही. रियाज भाटी म्हणे गायब आहे. खरं तर तो गायब आहे पळवलं गेलंय?

आमचा आरोप आहे की, रियाज भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाहीए ना? कारण वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये सुद्धा रियाज भाटी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, रियाज जर कोठडीत आला तर सत्य बाहेर येईल म्हणून त्याला राष्ट्रवादीने तर पळवलं नाही ना?’ असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

    follow whatsapp