जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
ADVERTISEMENT
राज्यात महिलांवरील अत्याचारासह इतर गुन्हेगारी घटना वाढल्याचं चित्र असताना वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममध्ये आज एका आरोपीने चक्क न्यायालयात जाऊन कारकुनावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कारकून गंभीर जखमी झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा न्यायालयात दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. एका प्रकरणातील आरोपींनी बदल्याच्या भावनेतून हा हल्ला केला.
दुपारी तीन वाजता कारंजा न्यायालयात आलेल्या आरोपी अब्दुल एजाज अब्दुल सत्तार या आरोपीने न्यायालयात काम करत असलेल्या कारकूनावर चाकू हल्ला केला. प्रताप राठोड असं कार्यरत कारकूनाचं नाव आहे. न्यायालयातच आरोपीने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली.
कारकून प्रताप राठोड हे कार्यालयात काम करत असताना अब्दुल एजाज अब्दुल सत्तार याने चाकूने हल्ला केला. यात ते ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रताप राठोड यांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याच गोष्टीच्या रागातून आरोपी अब्दुल एजाज अब्दुल सत्तार याने चाकू हल्ला केला. कारंजा बार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण खंडागळे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. कारंजा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला आहे.
ADVERTISEMENT
