राष्ट्रवादी-मनसे वाद वाढणार? आव्हाडांनी राडा केलेल्या मॉलमध्ये ‘हर हर महादेव’चा मोफत शो

मुंबई तक

• 11:45 AM • 08 Nov 2022

ठाणे : हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु झालेला वाद थांबण्याची अद्याप चिन्ह नाहीत. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील रात्री १० वाजताचा शो बंद पाडल्यानंतर जळगांव, सोलापूर जिल्हांमधीलही शो बंद पाडण्यात आले. दरम्यान, ठाण्यातील शो बंद पाडताना राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा जोरदार राडा झाला होता. यात एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचंही समोर आलं […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु झालेला वाद थांबण्याची अद्याप चिन्ह नाहीत. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील रात्री १० वाजताचा शो बंद पाडल्यानंतर जळगांव, सोलापूर जिल्हांमधीलही शो बंद पाडण्यात आले. दरम्यान, ठाण्यातील शो बंद पाडताना राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा जोरदार राडा झाला होता. यात एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचंही समोर आलं आहे.

हे वाचलं का?

यानंतर परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीनुसार आव्हाड यांच्यासह तब्बल १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशातच आता आव्हाड यांनी राडा घातलेल्या ठिकाणी मनसेच्यावतीने हर हर महादेव या चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता हा शो दाखविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याबाबतच पोस्टर मनसेनं प्रसिद्ध केलं आहे. मनसे (ठाणे) शहर शाखेच्या वतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.

आव्हाडांवर गुन्हा दाखल :

मारहाण झालेल्या परिक्षित विजय दुर्वे यांच्या तक्रारीनुसार आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यातं आला आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 141, 143, 146, 149, 323, 504 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट प्रदर्शन करण्यास विरोध, बेकायदेशीर जमाव जमवणे, ‘हर हर महादेव’ चित्रपटचा शो काही वेळासाठी बंद करण्यात आला, प्रेक्षकांना झालेल्या धक्काबुक्की आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाज यांच्या या आक्रमक भूमिकेनं राज्याचं लक्ष वेधून घेलतं आहे.

ठाण्यात राडा : जितेंद्र आव्हाडांवर मनसेची टीका

काल आव्हाड यांनी शो बंद पाडताच काही वेळात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तिथं पोहचले अन् त्यांनी बंद पडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. तसंच एखाद्याला मारहाण करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल आव्हाड यांना विचारला.

ते म्हणाले, तुम्ही मंत्री होता ना काही दिवसांपूर्वी? तुम्ही संविधान मानणारे आहात ना? मग मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तसंच जर दम असेल समोरा-समोर या. हे रात्री १० च्या शोमध्ये यायचं आणि पब्लिकला मारायचं ही कोणती पद्धत? असा सवाल केला.

तर मराठी प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दिन मियांना कोणी दिला आहे? सत्ता गेल्याच्या हतबलतेतून हे सुरू आहे का? सरकारनं आव्हाड व त्यांच्या चमचांवर कारवाई करावी. सिनेमाबद्दल मतभेद एका बाजूला पण ही गुंडगिरी चालणार नाही. सिनेमा पाहायचा की नाही हे लोक ठरवतील’, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी केली.

    follow whatsapp