तेरे नाम पे खतम ! राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत नांदगावकरांनी पक्षांतराच्या बातम्या ठरवल्या खोट्या

पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर पुन्हा एकदा पक्षातल्या गळतीची चर्चा सुरु झाली. रिकामटेकड्या लोकांना कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये आणखी दोन मनसे नेत्यांच्या पक्षांतराच्या बातम्यांना उधाण आलं. यात राज ठाकरेंचे राईट हँड समजले जाणारे बाळा नांदगावकर हे मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:40 AM • 17 Dec 2021

follow google news

पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर पुन्हा एकदा पक्षातल्या गळतीची चर्चा सुरु झाली. रिकामटेकड्या लोकांना कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये आणखी दोन मनसे नेत्यांच्या पक्षांतराच्या बातम्यांना उधाण आलं. यात राज ठाकरेंचे राईट हँड समजले जाणारे बाळा नांदगावकर हे मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

हे वाचलं का?

परंतू बाळा नांदगावकर यांनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना नांदगावकरांनी आपण मनसे पक्ष सोडणार नसल्याचं सांगितलं. यानंतर राज ठाकरेंसोबतचा एक फोटो पोस्ट करत नांदगावकरांनी सूचक शब्दांमध्ये आपण राज ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं जाहीर केलं.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नांदगावकरांनी गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या धादांत खोट्या ठरवल्या आहेत. “मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरं तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही”, असं म्हणत नांदगावकरांनी आपल्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या ठरवल्या आहेत.

दुसरीकडे ठाणे शहरातील मनसे नेते आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचा शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पानसेही मनसेला जय महाराष्ट्र करणार अशा चर्चा सुरु झाल्या. स्वतः अभिजीत पानसे यांनी उदय सामंत यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरीही मनविसेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून ही बातमी खोटी ठरवली आहे.

राज ठाकरेंप्रमाणेत बाळा नांदगावकर आणि अभिजीत पानसे यांचा राजकीय प्रवास शिवसेनेसोबत सुरु झाला. यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या साथीने मनसेमध्ये प्रवेश केला. यानंतर शिवसेनेत विद्यार्थी सेनेची जबाबदारी सांभाळणारे अभिजीत पानसेही मनसेत दाखल झाले. मनसेच्या सुरुवातीच्या काळात १३ आमदारांपैकी महत्वाचे नेते म्हणून बाळा नांदगावकर यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांत अनेक महत्वाच्या नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली असली तरीही बाळा नांदगावकर हे अजुनही राज ठाकरेंसोबत कायम आहेत.

    follow whatsapp