पुणे: राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंग्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम ठरवून दिला. पण लढाईदिवशीच पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे नॉट रिचेबल झाले. आता त्यांनी नॉट रिचेबल असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
राज आंदोलनाबद्दल आपला कार्यक्रम आधीच ठरल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच वसंत मोरेंचं नेमकं म्हणणं काय, पूर्वनियोजित कार्यक्रम काय ठरला होता, तेच आपण जाणून घेणार आहोत.
राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याविरोधात जाहीर भूमिका घेतली. पण या भूमिकेला पक्षातूनच विरोध झाला. नाराजीचा सूर उमटला. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंसोबत सावलीसारखं फिरणारे वसंत मोरे यांनीच मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मोरे राजसाथ सोडणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
या सगळ्या काळात बरंच राजकारण रंगलं होतं. तसंच त्यांना पुण्याचं शहराध्यक्ष पदंही यामुळे गमवावं लागलं होतं. त्यामुळे वसंत मोरे हे आता मनसे सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सगळ्या चर्चा फेटाळून लावत मोरेंनी ‘राजमार्ग’च आपला मार्ग असल्याचा खुलासा केला. त्यामुळे वसंत मोरे राज ठाकरेंचा आदेश पाळत 4 तारखेच्या भोंगा आंदोलनात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवतील, असं म्हटलं गेलं होतं.
मात्र आंदोलनाच्या दोन दिवस आधीच मोरेंनी पुणे सोडलं. नॉट रिचेबल झाले त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं. वसंत मोरे हे नॉट रिचेबल असणं म्हणजे ‘लढाई के दिन खाडे’ असल्याचं म्हटलं गेलं. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरा पावणेबाराला मोरेंची प्रतिक्रिया समोर आली.
फेसबूकवर पोस्ट टाकत वसंत मोरेंनी आपला कार्यक्रम आधीच ठरल्याचं स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली. आणि भविष्यातही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार…!’
कधीकाळी पुण्यातले मनसेचे कारभारी असलेल्या वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘साहेब’ असा करत आपला इलाखा म्हणजे आपला वॉर्ड असल्याचं सांगितलं. तसंच तिरुपतीतून साहेबांचा कार्यक्रम मशिदप्रमुखांशी बोलून ठरवून अंमलात आणल्याचा दावा केला. पण वसंत मोरेंच्या या दाव्यातूनच काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण…
भावाच्या मुलाचं पूर्वनियोजित लग्नकार्य सोडून मोरे ठाण्यातील उत्तर सभेला गेले. मग राज ठाकरेंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असलेल्या भोंगा आंदोलनात रस्त्यावर का उतरले नाहीत, तिरुपतीतूनच मशिद प्रमुखांशी बोलून राज आंदोलनाचा करेक्ट कार्यक्रम करण्यात धन्यता का मानली? असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
