मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील स्वारगेट येथे सभा घेऊन जोरदार फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा सगळ्यांचाच समाचार घेतला. तर दुसरीकडे त्यांनी अयोध्या दौरा ते MIM व्हाय औरंगजेबाची कबर, मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण यासारख्या अनेक मुद्द्यावर तडाखेबंद भाषण केलं. त्यांच्या याच भाषणातील काही मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाहा राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या भाषणातील 15 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे:
-
SP कॉलेजचं ग्राऊंड मिळतंय का ते पाहा, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. पण आम्हाला असं सांगण्यात आलं की, राजकीय सभांच्या कार्यक्रमांना आम्ही मैदान देत नाही. मग आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. मग आम्हाला नदीपात्रात जागा मिळाली. पण हवामान असं आहे की, पाऊस कधीही येऊ शकतो. मुंबईत काल पाऊस झाला पुण्यात पाऊस आज होण्याची शक्यता आहे. वातावरणामुळे उगीच निवडणुका नाही तर पावसात भिजून भाषण कशाला करायचं?
-
मला अयोध्येला येऊ देणार नाही अशा धमक्या काही जण देत आहेत. मला अनेकांकडून माहिती मिळत होती. अगदी मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश. पण हा सगळा ट्रॅप होता. तिकडे वातावरण तापवलं जात आहे. समजा, मी तिथे हट्टाने गेलो असतो. तिथे हजारो मनसैनिक आले असते.
-
समजा, तिकडे चुकून काय झालं असतं तर तिकडे आपली पोरं गप्प बसली नसती. मग पोरांवर केसेस टाकल्या असत्या. तुम्हाला जेलमध्ये सडवलं असतं. म्हणून मी दौरा स्थगित केला. हा सगळा सापळा होता. मला सापळ्यात अडकून आपली ही पोरं, ही ताकद गमवायची नव्हती. एक खासदार तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान कसं देऊ शकतो? यांना आताच कशीच जाग आली? एकमेकांविरुद्ध नेहमी भांडतात. पण आपल्या वेळेस कसे सगळे बरोबर एकत्र येतात. तुम्हाला आता जाग आली का? १३-१४ वर्षानंतर.. माफी मागण्याबाबत. पण आत्ताच सांगतोय.. मी अयोध्या दौऱ्यावर जाणार… रामलल्लाचं दर्शन घेणार. जर मी हट्टाने गेलो असतो, तर माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते, मग ऐन निवडणुकीवेळी त्या केसेस चालवल्या असता आणि इथे कोणी नसतं, हा सगळा सापळा होता. मी जात नाही म्हटल्यावर माझ्यावर टीका झाली. पण त्या शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही.
-
राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असं म्हणतात. पण गुजरातमध्ये बिहारींना मारणाऱ्यांना तिथून हाकलून लावलं त्याबाबत कोणाला माफी मागायला लावणार?
-
ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पीकर झोंबलं, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात अन्यथा एकमेकांशी भांडत असतात. मी सांगितलं की, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा पण त्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला निघाले. अरे मातोश्री काय मशिद आहे का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जेलमध्ये गेले. मग अनेक टीका झाल्या. राणा दाम्पत्याचा सगळा राडा आपण दोन दिवस सलग पाहिला. पण हेच राणा दाम्पत्य लडाखमध्ये राऊतांसोबत जेवताना दिसले.
-
मुख्यमंत्र्याची सभा झाली, काय पोरकटपणा चाललाय कळत नाही, आमचं खरं हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व.. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही प्रश्न हा आहे की खरं हिंदुत्वाचा रिझल्ट लोकांना पाहिजे तो आम्ही देतोय, महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो.
-
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रेल्वेची भरती होती तर इथल्या मुलांनाच त्या नोकऱ्या मिळायला हव्या अशी माझी मागणी होती. जर नोकऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असतील तिथल्या पोरांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. पण त्यावेळी असं घडलं की, भरती महाराष्ट्रात आणि जाहिराती बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पेपरमध्ये येत होत्या. त्यामुळे रेल्वेचं आंदोलन झालं होतं. त्यावेळी आपल्या मुलांना एका परप्रांतियाने आईवरुन शिवी दिली आणि तिकडून सगळं सुरु झालं होतं. या सगळ्यामध्ये जेव्हा ममता बॅनर्जी या रेल्वे मंत्री झाल्या तेव्हा त्यांनी प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषेत रेल्वेच्या परीक्षा होती असा निर्णय घेतला. हे घडलं फक्त मनसेमुळे.
-
एक आंदोलन दाखवा जे मी अर्धवट सोडलं, टोल नाक्याचं आंदोलन हातात घेतलं. जवळपास राज्यातील 64 टोलनाके बंद झाले. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते त्यांना आम्ही देशातून हाकललं. तेव्हा कोणत्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही आम्हाला सांगत आहात?
-
उद्धव ठाकरेंनी मला सांगावं की, तुमच्यावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? परवा दिवशी म्हणाले.. संभाजीनगर नामांतर झालं काय किंवा नाही झालं काय.. मी बोलतोय ना… अरे तू आहेस कोण? तू काय वल्लभभाई पटेल आहेस की गांधीजी आहे? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे. इतके वर्ष सत्तेत राहून तुम्ही संभाजीनगरचा प्रश्न सोडवला नाही. कारण तुम्हाला निवडणुकीसाठी तो मुद्दा जिवंत ठेवायचा आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे लवकरच औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करा आणि यांचं राजकारणच मोडीत काढा.
-
यांनी स्वत:च्या राजकारणासाठी MIM ला मोठं केलं. त्या औंरगाबादेत एमआयएमचा एक खासदार झाला. यांच्यासाठी त्यांनी जमीन भुशभुशीत करुन दिली आणि स्वत:चं राजकारण केलं. पण आता ती लोकं फोफावत आहे.
-
शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार. अफझल खान शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता. असं म्हणाले. तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी आला होता. मग काय शिवाजी महाराज यांच्यामध्ये आले होते?
-
शरद पवार म्हणतात, आम्ही दिवसा भांडायचो आणि रात्री एकत्र जेवायचो. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडीबिलिटी घालवत आहेत हे शिवसेनेला कळत नाही.
-
मनसेमुळे इतिहासात पहिल्यांदा सकाळची अजान बंद झाली. आवाज कमी नको, थेट भोंगेच खाली उतरवा. मी सांगतोय.. भोंग्यांचं आंदोलन हे एक दिवसांचं नाही. ते तुम्हाला तपासून पाहत आहेत. विसरतात की, काय.. त्यामुळे आता जे काही सुरु केलं आहे ना.. त्याचा तुकडा पाडूनच टाका. जो कायदा पाळा सांगतोय त्याला अटक, तडीपार, नोटीस पाठवतात. जे कायदा पाळत नाही त्यांच्याशी तुम्ही मात्र चर्चा करत आहात. आमच्या 28 हजार पोरांना नोटीस पाठवल्या. संदीप देशपांडे जसं काय पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखं पोलीस शोधत होते. शेवटी संदीपच्या बायकोने फ्रीज उघडून दाखवला आणि सांगितलं घरात नाहीए तो.
-
शिवछत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाची छोटीशी कबर प्रतापगडावर बांधली होती. पण आता तिथे जाऊन पाहा काही हजार फूट ती जागा व्यापून तिथे अफजलखानाची मशिद तयार झाली आहे. या कबरीसाठी फंडींग देणारे लोक कोण आहेत?
-
माझी शस्त्रक्रिया झाली की, जरा तीन-चार आठवडे रिकव्हरीमध्ये जातील. पण त्यानंतर १-२ महिन्यात मी पुन्हा तुमच्यासमोर येईल. तूर्तास आपलं जे आंदोलन सुरु आहे ते सुरुच ठेवा. लवकरच मी मनसैनिकांना एक पत्र देईल. ते घरोघरी पोहचलं पाहिजे आपली भूमिका लोकांना समजली पाहिजे.
महात्मा गांधी आहात की सरदार पटेल? संभाजी नगर नामांतरावरून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा टोला
अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातूनच सगळ्याच विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता विरोधक राज ठाकरेंना कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
