मुंबईत शुक्रवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये निर्माणाधीन असलेला मोठा पूल कोसळला. या दुर्घटनेत जवळपास 13 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली असून, जखमींवर बी.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईतील बीकेसी परिसरात एमएमआरडीएकडून पुल उभारण्याचं काम सुरु आहे. हे काम सुरू असतानाच मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास बीकेसी मुख्य रस्ता व सांताक्रुझ-चेंबूरला जोडणाऱ्या निर्माणाधीन पूलाचा मोठा भाग कोसळला.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व अग्शिमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत 13 मजूर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. जखमींना बी.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरू आहेत.
या पुलावर 20 ते 25 मजूर काम करत होते. पूल कोसळला त्यावेळी काही मजूरांनी पाण्याच्या टाकीत उड्या मारल्या, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी पुलाच्या सळयांना पकडल्या होत्या.
ADVERTISEMENT











