नियम पाळा नाहीतर मुंबईतही लॉकडाउन – पालकमंत्री अस्लम शेख

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची लस बाजारात येऊन लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारसमोरची चिंता वाढली आहे. मुंबईसह, पुणे, नाशिक, ठाणे आणि विदर्भातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भर पडते आहे. विदर्भातील काही शहरांसह नाशिक आणि ठाण्यातील हॉटस्पॉट भागांमध्ये प्रशासनाने […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:51 AM • 09 Mar 2021

follow google news

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची लस बाजारात येऊन लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारसमोरची चिंता वाढली आहे. मुंबईसह, पुणे, नाशिक, ठाणे आणि विदर्भातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भर पडते आहे. विदर्भातील काही शहरांसह नाशिक आणि ठाण्यातील हॉटस्पॉट भागांमध्ये प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबईतही लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर अंशतः लॉकडाउन लावलं जाईल असा अशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ठाण्यातील हॉटस्पॉट क्षेत्रात आता ३१ मार्चपर्यंत Lockdown

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबईत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्याच्या पर्यायावर चर्चा झाली आहे. गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत रुग्णवाढीचा वेग हा प्रचंड होता. नवीन वर्षात मार्च महिन्यामध्येच ती परिस्थिती ओढावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरुवातीला सरकार, रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक दंड, लग्न आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी केल्यास कारवाई असे पर्याय आजमावून पाहणार आहे. परंतू तरीही परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही तर शहरात अंशतः लॉकडाउन लावलं जाईल अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

नाशिकमध्येही अंशत: लॉकडाऊन, नाशिककरांवर काय असणार निर्बंध?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आपल्याला कठोर निर्बंध लागू करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या वाढत आहे, तिकडे लॉकडाउन लावता येऊ शकतं. जिल्हा प्रशासनाला स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन लॉकडाउन जाहीर करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही टोपे यांनी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं. सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. असं झालं नाही तर आर्थिक दंड वाढवण्याबाबतही विचार करावा लागेल असं टोपे म्हणाले.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनानेही वाढत्या रुग्णसंख्येविरोधात कडक पावलं उचलण्याची तयारी केली आहे. गेल्या ८ दिवसांमध्ये कल्याण-डोंबिवली भागात १ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी लसीकरणाला सहकार्य करावं. येत्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात न आल्यास कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा आयुक्त डॉ. विजय सु्र्यवंशी यांनी दिला आहे. याचसोबत एखाद्या बिल्डींगमध्ये कोणाला कोरोनाची लागण झाली असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून बिल्डींगमधील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय.

    follow whatsapp