मुंबईत सराफाच्या दुकानात चोरी, ८ कोटींचा मुद्देमाल पळवून गावच्या जमिनीत पुरला; आरोपींना अटक

मुंबईच्या भुलेश्वर भागात १४ जानेवारीला एका ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीचा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. फिर्यादी खुशाल रसीकलाल टामका यांचं भुलेश्वर भागात जेनीशा ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. टामका यांच्या दुकानात काम करणारा नोकर गणेश कुमार आणि त्याचा साथीदार रमेश प्रजापती व अन्य तिघांनी तिजोरीतले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ कोटींचा मुद्देमाल पळवून नेला […]

Mumbai Tak

मुस्तफा शेख

• 01:58 PM • 28 Jan 2022

follow google news

मुंबईच्या भुलेश्वर भागात १४ जानेवारीला एका ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीचा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. फिर्यादी खुशाल रसीकलाल टामका यांचं भुलेश्वर भागात जेनीशा ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. टामका यांच्या दुकानात काम करणारा नोकर गणेश कुमार आणि त्याचा साथीदार रमेश प्रजापती व अन्य तिघांनी तिजोरीतले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ कोटींचा मुद्देमाल पळवून नेला होता. यावेळी आरोपींनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला.

हे वाचलं का?

टामका यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ कोटींच्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. तांत्रिक माहिती आणि तपासाअंती पोलिसांनी सर्व आरोपी आपल्या मुळ गावी राजस्थानला गेल्याचं शोधून काढलं. त्यानुसार पोलिसांनी पथकं राजस्थानला पाठवून सर्व आरोपींना अटक केली आहे.

१८ जानेवारीला राजस्थानच्या रेवदर येथून या गुन्ह्यातील आरोपी रमेश प्रजापतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपीने आपल्या शेतजमिनीत ९०७०.७१ ग्रॅम वजनाचं सोनं आणि रोखरक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. बाजारभावात या सोन्याची किंमत ४ कोटींच्या घरात आहे. यानंतर रमेशने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील मुद्देमाल जप्त केला.

परंतू या गुन्ह्यातला मुख्य आरोपी गणेश कुमार अजूनही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. २२ जानेवारीला पोलिसांना गणेश मध्य प्रदेशमध्ये असल्याचं कळलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत गणेशला इंदूर शहरातून अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना आश्रय देणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन व्यक्तींनाही अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे या घटनेत १० आरोपींना अटक केली आहे. चोरट्यांनी ८ कोटी १९ लाख ६७ हजार ८७१ रुपयांची मालमत्ता पळवली होती. त्यापैकी मुंबई पोलिसांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशात केलेल्या कारवाईतून ७ कोटी १२ लाख ६० हजार ८० रुपयांची मालमत्ता जप्त केली. या कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

    follow whatsapp