Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) Election 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आता निकाल जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, PRAB या रिसर्च संस्थेने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी चुरशीची लढत झाल्याचं चित्र दिसत आहे.
ADVERTISEMENT
या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार गट (AP) आणि शरद पवार गट (SP) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र, PRAB च्या एक्झिट पोलनुसार भाजपने या आव्हानावर मात करत 64 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणाला किती जागा मिळणार?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप 64 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटाला 51 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवार गटाला केवळ 02 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाला 09 जागा, मनसेला 01 जागा आणि काँग्रेसला देखील 01 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, भाजप बहुमताच्या जवळ पोहोचत असला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागू शकतो. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढूनही अपेक्षित यश मिळवू शकले नसल्याचं चित्र आहे. विशेषतः शरद पवार गटाची कामगिरी अत्यंत मर्यादित राहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि श्रीमंत महापालिकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार आणि महेश लांडगे यांनी या निवडणुकीत एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, हा एक्झिट पोल केवळ अंदाज असून प्रत्यक्ष निकाल वेगळे असू शकतात. मात्र, PRAB च्या या सर्वेक्षणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता मतमोजणीच्या दिवशी नेमकं कोण सत्तेची चावी हातात घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











