अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

मुंबई तक

31 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:30 AM)

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी एका विधानात छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असा आरोप भोसले यांनी केला आहे. यावरच आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची […]

Mumbaitak
follow google news

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी एका विधानात छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असा आरोप भोसले यांनी केला आहे. यावरच आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते : अजित पवार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राच्या धर्तीवर २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राती वीर बाल दिवसची घोषणा केली. या घोषणेवर अजित पवार यांनी शिंदे यांचं अभिनंदन केलं. मात्र त्याचवेळी राज्यातील ‘बाल शौर्य पुरस्कार’चीही आठवण करुन दिली.

अजित पवार म्हणाले, बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. या पुरस्काराची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. त्या मंत्रिमंडळामध्ये आपणही होता अशी आठवण त्यांनी एकनाथ शिंदे यांना करुन दिली.

ते पुढे म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक म्हणतो. ते स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असंही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.

अजित पवार यांनी राजीनामा द्यावा :

अजित पवार यांच्या याच भाषणावरुन भाजप आक्रमक झाला असून तुषार भोसले यांनी पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भोसले म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात, ‘छ्त्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते…’ यातून त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्यामुळे अजित पवार ना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?यावर अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अजित पवार यांचे 14 मे 2019 चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार 2019 पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता 2022 मध्ये कशी त्यांना उपरती आली? असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनाही प्रश्न :

यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न करत भोसले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली भूमिका बदलणार आहेत का? ते अजित पवार यांचा निषेध करणार का? आता संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? असा सवाल केला आहे.

    follow whatsapp