‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी-मनसे भिडले : ठाण्याच्या मॉलमध्ये तुफान राडा

मुंबई तक

07 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:38 AM)

ठाणे : येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन राष्ट्रवादी विरुद्ध मनसे आमने-सामने आलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन रात्री दहा वाजताचा शो बंद पाडला. तर त्याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान, चित्रपटगृहात जोरदार राडा झाला. या राड्यात प्रेक्षकांनी पैसे परत […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन राष्ट्रवादी विरुद्ध मनसे आमने-सामने आलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन रात्री दहा वाजताचा शो बंद पाडला. तर त्याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान, चित्रपटगृहात जोरदार राडा झाला. या राड्यात प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एका प्रेक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

या राड्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची जी पुरंदरेंची परंपरा आहे, ती आता चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ही पद्धत महाराष्ट्रात आणली आहे. पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

तर आव्हाड यांनी शो बंद पाडताच काही वेळात मनसेचे नेते अविनाश जाधव तिथं पोहचले, अन् त्यांनी बंद पडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. तसंच एखाद्याला मारहाण करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल आव्हाड यांना विचारला. ते म्हणाले, तुम्ही मंत्री होता ना काही दिवसांपूर्वी? तुम्ही संविधान मानणारे आहात ना? मग मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तसंच जर दम असेल समोरा-समोर या. हे रात्री १० च्या शोमध्ये यायचं आणि पब्लिकला मारायचं ही कोणती पद्धत?

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.

मात्र असे काही सिनेमा इतिहासाची मोडतोड करून काढले जात आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही. इतिहासाचा विपर्यास केला जातो आहे. असे सिनेमा लोकांपुढे कसे घेऊन जायचे? शिवाजी महाराज, त्यांचे मावळे ही आपली प्रेरणा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी कशी चालेल? इतिहासाचा गाभा का सोडत आहेत? असेही प्रश्न संभाजीराजेंनी विचारलं आहे

शिवेंद्रराजेही आक्रमक :

संभाजीराजे छत्रपती यांच्यानंतर साताऱ्याची गादीही या चित्रपटांविरोधात आक्रमक झाली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, चित्रपटांमधे इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचा खेळ करू नये, असं केल्यास या चित्रपटांना लोकांनी बॉयकॉट करावं. हे चित्रपट पाहू नये, असा दम भरला.

    follow whatsapp