Omicron : नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही – BMC आयुक्त इक्लाब चहल यांची माहिती

मुस्तफा शेख

• 12:03 PM • 30 Nov 2021

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र आणि राज्य सरकारने बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध पुन्हा एकदा कडक केले आहेत. मुंबई शहरातही महापालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा लॉकडाउन लागणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र आणि राज्य सरकारने बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध पुन्हा एकदा कडक केले आहेत. मुंबई शहरातही महापालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा लॉकडाउन लागणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण होतं.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावर उत्तर दिलं असून मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

Omicron: डेल्टापेक्षा अधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Omicron व्हेरिएंटपासून कसा कराल बचाव?

बाहेर पडताना नागरिकांनी मास्क घालावेत, लवकरात लवकर आपले लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन घ्यावेत असं आवाहन चहल यांनी केलं आहे. मुंबईत पुन्हा लॉकडाउन लागणार का या प्रश्नाचं उत्तर देताना चहल यांनी, नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही. महापालिकेची यंत्रणा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

कोविड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महापालिकेने सुधारणा केली असून हॉस्पिटल बेडमध्ये पुरेशा जागा आणि ऑक्सिजनचा पुरवठा आहे. मात्र लोकांनी घाबरुन न जाता कोरोनाचे सर्व नियम सजगतेने पाळणं गरजेचं असल्याचंही चहल म्हणाले. नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या शाळा १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

Lockdown News : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?

शाळकरी मुलांना या नवीन व्हेरिएंटचा धोका असू शकतो. सध्या यावरच बरंच संधोशन सुरु आहे. येत्या १०-१२ दिवसांत याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर आम्ही याबद्दल रणनिती आखू, असं चहल म्हणाले. महापालिकेने केंद्राला पत्र लिहून लसीच्या दोन डोसमधलं अंतर ८ आठवड्यावरुन ४ आठवड्यावर आणण्यासंदर्भात पत्र लिहीलं आहे. यावर बोलताना चहल म्हणाले की “हे अंतर कमी झालं तर आम्ही उर्वरित २७ लाख नागरिकांचं लसीकरण एका महिन्यात पूर्ण करु शकतो. मुंबईतल्या १२५ खासगी रुग्णालयात लसीचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडून लसीच्या अतिरीक्त साठ्याची गरज लागणार नाही. त्याप्रमाणे आम्ही केंद्राला कळवणार आहेत.”

महापालिकेने नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लोकांना नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. ६ डिसेंबरला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लाखो अनुयायी येत असतात. परंतू यंदा ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लाखो अनुयायांना घरातूनच बाबासाहेबांना आपलं अभिवादन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या परिस्थितीशी लढण्यासाठी महापालिका पूर्णपणे तयार असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp