महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे आटोक्यात आलेली नसताना Delta Plus Varient ने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत राज्यात ५ रुग्णांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटने मृत्यू झाला असला तरीही लोकांनी यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. डेल्टा प्लस विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता कोरोनाचे सर्व नियम, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याचं पालन करावं अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
“लोकांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल घाबरुन जाण्याची गरज नाहीये, याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी. आतापर्यंत डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांचे मृत्यू हे याच कारणामुळे झाले असं म्हणणं योग्य ठरणार नाही. या सर्वांची वय ही ६५ वर्षापेक्षा जास्त होती आणि त्यांना सहव्याधींनी ग्रासलं होतं. परंतू या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रत्येक जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवत आहे.”
Delta Plus virus मुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू
राज्य सरकार सध्या सर्व निकष आणि शक्यतांचा विचार करुन ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण जास्त आढळत आहेत व ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे कमी रुग्ण आढळत आहेत अशा सर्व ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करत आहे. या भागात रुग्णांच्या चाचणी प्रमाण वाढवण्यात येत आहे. रुग्णांची संपूर्ण मेडीकल हिस्ट्री तपासली जात आहे. रुग्णाने कोरोनाची लस कुठे घेतली आणि त्याला कोणत्या ठिकाणी या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली याचाही शोध घेतला जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही आयसोलेट करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.
राज्याच्या आरोग्ययंत्रणा प्रत्येक जिल्ह्यातून १०० सँपल्स घेत असून ही सँपल्स genome sequencing प्रक्रीयेसाठी पाठवली जात असल्याची माहिती टोपे यांनी दिलं. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही या व्हेरिएंटची लागण झाल्याबद्दल टोपेंनी आश्चर्य व्यक्त केलं.
ADVERTISEMENT











