Sanjay Rathod यांना युवतीच्या आत्महत्या प्रकरणी क्लिन चिट मिळालेली नाही असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. या युवतीच्या पालकांनी काही तक्रार नाही असं म्हटलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळपासूनच माध्यमांमध्ये संजय राठोड यांना क्लिन चिट दिल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बाब नाकारली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
पूजा चव्हाण या तरूणीने टिकटॉक स्टारने आत्महत्या केली. पुण्यात राहण्यासाठी आलेल्या या मुलीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर दोन दिवसांनीच १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिप्समधला आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने केला. तसंच संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली.
याआधीच्या म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी संजय राठोड यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला. संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली होती. एवढंच नाही तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही संजय राठोड यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते. संजय राठोडे हे आरोपांवर पंधरा दिवस शांत होते. त्यानंतर त्यांनी बंजारा समाजाचं पवित्र स्थान असलेल्या पोहरा देवी या ठिकाणी जाऊन शक्ती प्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आणि तिथे हजारोंचा जमाव आल्यानंतर त्यावरूनही उद्धव ठाकरे सरकारवर टीका झाली.
अधिवेशनाच्या बरोबर एक दिवस आधी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवरच या राजीनाम्याचं खापर फोडलं. यावेळी त्यांनी पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी लिहून दिलेलं पत्रही वाचून दाखवलं होतं. या प्रकरणी आज संजय राठोड यांना क्लिन चिट दिल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे कारण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच अशी कोणतीही क्लिन चिट संजय राठोड यांना मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आज पोलीस अधिकारी काय म्हणाले?
या प्रकरणाचे तपास अधिकारी दीपक लगड यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. ‘या प्रकरणाची अजुनही चौकशी सुरु आहे आणि कोणालाही क्लिन चिट देण्यात आलेली नाही. आमचा कोणावरही आरोप नाही असा जबाब पुजाच्या आई-वडिलांनी याआधीच नोंदवला होता, हा जबाब काही नव्याने नोंदवलेला नाही.’ पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही याप्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगत कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
