पुणे : पतीच्या त्रासामुळे मुलीसह संपवलं होतं आयुष्य; 29 वर्षांनंतर उच्च न्यायालयात मिळाला न्याय

विद्या

• 12:17 PM • 25 Dec 2021

पती आणि सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका महिलेनं मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अखेर 29 वर्षांनंतर महिलेला न्याय मिळाला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या […]

Mumbaitak
follow google news

पती आणि सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका महिलेनं मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अखेर 29 वर्षांनंतर महिलेला न्याय मिळाला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली.

हे वाचलं का?

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तर आरोपीसोबत राहणाऱ्या भारती नावाच्या महिलेला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

मूळ घटना काय?

मुलीसह आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव जनाबाई आहे. जनाबाई यांचा रामदास धोंडू कलाटकर यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन्ही मुली झाल्या. पहिल्या मुलीचं अचानक निधन झालं. त्यांनंतर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जनाबाई काही दिवसांसाठी आईवडिलांकडे माहेरी गेल्या होत्या.

माहेरी काही दिवस राहिल्यानंतर जनाबाई सासरी परतल्या. सासरी आल्यानंतर पती भारती नावाच्या महिलेसोबत राहत असल्याचं त्यांना कळालं. काही दिवस गेल्यानंतर पती, सासू, सासरे आणि भारती आपला छळ करत असल्याचं जनाबाईंनी आईवडिलांना सांगितलं. त्यानंतर जनाबाईच्या आईवडिलांसह भावांने यात प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, जनाबाईंना त्रास देणं सुरूच राहिलं.

छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल…

9 ऑक्टोबर 1992 रोजी जनाबाईंनी आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जनाबाईंनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा भाऊ आणि आईवडिलांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस कार्यवाहीनंतर प्रकरण पुणे सत्र न्यायालयात गेलं. न्यायालयात तिन्ही आरोपींनी आपण निर्दोष असल्याचं सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच आरोपी कलाटकरच्या आईचं निधन झालं.

सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांआधारे रामदास कलाटकर आणि भारतीला दोषी ठरवलं. न्यायालयाने कलाटकरला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली, तर भारतीला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली.

दोन्ही आरोपींनी पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या याचिकेवरील सुनावणीच्या काळातच भारती नावाच्या आरोपी महिलेचा मृत्यू झाला. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय, सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून मु्ंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई कलाटकरला महत्त्वाचा निकाला दिला.

निकाला देताना न्यायमूर्ती प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘नोंद असलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होतं की कलाटकरने जनाबाईसोबत शारीरिक आणि मानसिक क्रूरतापूर्ण वर्तणूक केली. वाईट वागणूक देण्याबरोबर जनाबाईंना आरोपीने अपमानित केलं, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

आरोपीला शिक्षा ठोठावताना न्यायालय म्हणाले, ‘स्त्री दुसऱ्या घरचं धन असल्याची समाजाची मानसिकता आहे. तिचं खरं आयुष्य सासुरात असल्याचं मानसिकता आहे. अडचणी सहन कराव्या लागल्या तरी महिलेनं दिल्या घरी सगळं सहन करावं अशी अपेक्षा ठेवली जाते. जनाबाईंना आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. सासुरात राहण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे जनाबाईंनी रागाच्या भरात आत्महत्या केली नाही, तर मुलीला जन्म दिल्यामुळे अमानुष वागणूक मिळाल्याने आत्महत्या केली. होणाऱ्या छळातून आणि मुलीचं कोणतंही भविष्य नसल्याच्या कारणामुळे जनाबाईंनी स्वतःचंच नाही, तर मुलीचं आयुष्यही संपवण्याचा निर्णय घेतला. यातून आरोपीची क्रूरताच दिसते. कलाटकरने अशी परिस्थिती निर्माण केली की, ज्यामुळे जनाबाईंना आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही, असं महत्त्वपूर्ण भाष्य न्यायालयाने केलं.

    follow whatsapp