दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

मुंबई तक

• 03:40 PM • 04 Feb 2022

मुंबई: कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

हे वाचलं का?

मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती.

या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावीच्या लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ऑफलाइनच होणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

कोरोना काळात ऑनलाइन वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा अधिकचा कालावधी देण्यात येणार आहेत. 70 ते 100 मार्कांची परीक्षा असल्यास अर्धा तास जादा वेळ दिला जाणार आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी असतील त्यांना झिगझॅक पद्धतीने बसवण्यात येईल. दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.

ठरलं! दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, पेपरची वेळही वाढवली

दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी 14 लाख 72 हजार 565 आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 31 लाख असून इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचं नियोजन आहे. महत्वाचं म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

    follow whatsapp