मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आज (7 जुलै) रोजी महाराष्ट्रातील मराठी भाषा वादावरून एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. झारखंडमधून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे दुबे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. पण यावेळी त्यांनी केवळ राज ठाकरेंवर टीका केली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला देखील डिवचलं.
ADVERTISEMENT
दुबे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, "मराठी लोकांकडे काय आहे? ते आमच्याच पैशांवर जगत आहेत. जर मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावे, तर त्यांना आपटून आपटून मारू." हे विधान राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी केलेल्या आंदोलनाला आणि त्यांच्या अलीकडील वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी केलं आहे.
हे ही वाचा>> 'आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी केला दूर', उद्धव ठाकरेंनी का केली अशी टीका?
भाजप खासदार निशिकांत दुबेंचं चिथावणीखोर वक्तव्य...
'बघा तुम्ही काय म्हणताय की, मराठी बोलावं लागेल? अरे तुम्ही कोणाच्या भाकऱ्या खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे.. पण कोणतंही युनिट महाराष्ट्रात नाही. टाटाने तर पहिली फॅक्टरी बिहार-झारखंडमध्येच सुरू केली होती. तुम्ही आमच्या पैशांवर पाळले जात आहात. तुम्ही कोणता टॅक्स लावता, कोणती इंडस्ट्री आहे तुमच्याकडे? खाणी आमच्याकडे आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा यांच्याकडे खाणी आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिफायनरी रिलायन्सने बसवल्या आहेत त्या गुजरातमध्ये बसवल्या आहेत. सगळ्या सेमी कंडक्टरच्या इंडस्ट्री या गुजरातमध्ये येत आहेत.'
'तुम्ही तरीही रुबाब करत आहात. याउपर तुम्ही आमचं शोषण करत आहात. जर तुमच्यात हिंमत आहे.. जर तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात तर उर्दू भाषिकांनाही मारा.. तामिळींना देखील मारा.. तेलगू भाषिकांना पण मारा. तुम्ही जी घाणेरडी कृत्य करत आहात.. मी नेहमी म्हटलंय की, तुम्ही तुमच्या घरात आहात, महाराष्ट्रात आहात.. खूप मोठे बॉस आहात ना.. तर चला बिहारला, चला उत्तर प्रदेशला.. चला तामिळनाडूला.. तुम्हाला आपटून-आपटून मारू..'
'आम्ही मराठीचा सन्मान करतो. मराठी एक आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज.. पेशवे.. तात्या टोपेंपासून सगळ्यांना आम्ही सन्मान करतो.'
'टिळक असो, लाजपत राय असो.. सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात.. गोपाळ कृष्ण गोखले असो.. सर्वांनी मोठं योगदान दिलं आहे. आम्ही सगळ्या मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यात, भारताच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान आहे.'
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?
'पण आज जे व्होट बँकेचं राजकारण.. कारण आता बीएमसीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे काम करत आहेत त्यापेक्षा काही घाणेरडं काम होऊ शकत नाही. आम्ही याचा प्रतिकार करू. जर त्यांच्यात हिंमत असेल.. जे मी म्हटलंय.. जर त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांच्या शेजारी जो माहीम परिसर आहे तिथे त्यांनी जावं आणि माहीमच्या दर्ग्यासमोर त्यांनी एखाद्या हिंदी किंवा उर्दू भाषिकाला मारून दाखवावं. तर मी मानेल की, ते खरोखरच बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहेत आणि बाळासाहेबांच्या सिद्धांतावर चालतात.' असं वादग्रस्त विधान निशिकांत दुबे यांनी केलं आहे.
कोण आहे निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे हे सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. ते झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1969 रोजी बिहारमधील भागलपूर येथे झालेला.
त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या एफएमएसमधून एमबीए आणि प्रथम विद्यापीठ, जयपूर येथून व्यवस्थापन विषयातील पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ही पदवी प्राप्त केली होती.
राजकीय कारकिर्द
निशिकांत दुबे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेतून केलेली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम केले आणि शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी गोड्डा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे फुरकान अन्सारी यांचा 6407 मतांनी पराभव करत विजय मिळवला.
त्यानंतर त्यांनी 2014, 2019 आणि 2024 मध्येही या मतदारसंघातून विजय मिळवला होता.
त्यांनी विविध संसदीय समित्यांमध्ये महत्त्वाचे पदे भूषवली आहेत, जसे की 2009-2014 मध्ये वित्त समिती, 2014-2019 मध्ये सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) आणि 2023 मध्ये गृह व्यवहार समितीचे सदस्य.
निशिकांत दुबे यांचे लग्न अनामिका गौतम यांच्यासोबत झाले आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. अनामिका धन्या भूती एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकीण आहेत, जी डिझाइन आणि सल्लागार सेवांमध्ये कार्यरत आहे. निशिकांत यांनीही काही काळ एस्सर ग्रुपमध्ये संचालक म्हणून काम केले होते, परंतु राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे पद सोडले.
दुबेंची वादग्रस्त विधाने
निशिकांत दुबे यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत, ज्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. एप्रिल 2025 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यावर टीका करताना धार्मिक युद्धे आणि नागरी उठावाला जबाबदार असल्याचा आरोप केलेला. तसेच, त्यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्तांवरही वादग्रस्त विधानं केली होती. यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रावर आणि इतरांवरही गंभीर आरोप केले आहेत.
संपत्ती आणि कायदेशीर बाबी
निशिकांत दुबे यांची सुमारे 46 ते 74 कोटी रुपये (विविध हिशेबांनुसार) इतकी संपत्ती असल्याचे नमूद केले जाते, ज्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 4 ते 8 गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर फसवणूक, धमकी आणि दंगली भडकवण्याचे आरोप आहेत. मार्च 2024 मध्ये त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर परित्रान वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या घोटाळेबाबत गुन्हा दाखल झाला होता.
ADVERTISEMENT
