पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट; जाणून घ्या फडणवीसांनी केलेले आरोप सोप्या शब्दात

मुंबई: ‘पोलीस दलात मोठ्या पोस्टिंगसाठी एक रॅकेट सुरु असून त्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत आहे. हे प्रकरण उघडकीस आलं असून देखील यासंबंधी कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली नाही.’ असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात पोलीस दलात बदल्यांसाठी मोठं रॅकेट काम करत असून पैशाची देवाणघेवाण होत असल्याचं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:38 AM • 23 Mar 2021

follow google news

मुंबई: ‘पोलीस दलात मोठ्या पोस्टिंगसाठी एक रॅकेट सुरु असून त्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत आहे. हे प्रकरण उघडकीस आलं असून देखील यासंबंधी कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली नाही.’ असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

हे वाचलं का?

राज्यात पोलीस दलात बदल्यांसाठी मोठं रॅकेट काम करत असून पैशाची देवाणघेवाण होत असल्याचं समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुराव्यांसह गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलातील बदल्याचं रॅकेट हे फारच गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले नेमके आरोप काय आहेत हे आपण अगदी सोप्या शब्दात समजू घेऊयात.

देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप समजून घ्या सोप्या शब्दात

‘राज्य सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या मोठ्या पोस्टिंगसाठी पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचं समोर आलं आहे. पण याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्याचीच बदली करण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा हवाला देखील दिला.

फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट, यावेळेस थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप

‘2017 साली मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना अशाच प्रकारच्या एका रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला होता. यावेळी काही जणांना अटक करण्यात आली होती. पण मागील काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचं रॅकेट पुन्हा सक्रीय झालं होतं. ज्याबाबत गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याबाबतची माहिती पोलीस महासंचालकांना कळवली. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुख्य सचिवांना याप्रकरणाची माहिती देत काही कॉल इंटरसेप्ट करण्याची परवानगी घेतली. ज्यानंतर काही अशी संभाषणं लक्षात आली की जी खूपच गंभीर होती. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित लोकांची नावं समोर आली आहेत.’

काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..

‘याबाबत सीओआयने एका विस्तृत अहवाल तयार केला होता. जो 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन पोलीस महासंचालकांना दिला होता. त्यानंतर 26 ऑगस्टला राज्याचे तत्कालीन गृह सचिव सीताराम कुंटे जे सध्या मुख्य सचिव आहेत त्यांना हा अहवाल सोपवला गेला होता. ज्यामध्ये याप्रकरणाची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती मुख्यमंत्री ठाकरेंना देखील देण्यात आली होती.’

‘पण यावर कोणतीही कारवाई न करता मुख्यमंत्र्यांनी हा अहवला गृहमंत्रालयाला पाठवला. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं माहिती असून देखील मुख्यमंत्र्यांनी त्यावर पांघरुण घातलं. कारण त्यांना आपलं सरकार वाचवायचं होतं. शिवाय रिपोर्टमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ज्या अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केले त्यांचीच बदली करण्यात आली. शिवाय फोन टॅपिंगमध्ये ज्या व्यक्तींची पोस्टिंगसाठी नाव घेतली जात होती त्यांना त्याच ठिकाणी पोस्टिंग मिळाली.’ असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारे असं म्हटलं की, ‘महाराष्ट्र पोलिसांच्या उच्चस्तरीय पोस्टिंगसाठी पैशाची देवाणघेवाण झाली आहे.’ हा फडणवीसांनी केलेला फार गंभीर आरोप आहे.

याच पत्रकार परिषदेत फडणवीसांनी असंही म्हटलं आहे की, ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. तसंच याबाबत रिपोर्ट देऊन देखील सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे आणि यासंबंधी सगळे पुरावे त्यांना देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.