Raj Thackeray Sabha Live: राज ठाकरे यांची सभा सुरु, मनसे प्रमुखांच्या निशाण्यावर कोण?

मुंबई तक

01 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चेतील सभा आज होत आहे. औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होत असून, मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी राज ठाकरे शनिवारीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही आज मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा होत आहे. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा आणि त्याला प्रत्युत्तर […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चेतील सभा आज होत आहे. औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होत असून, मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी राज ठाकरे शनिवारीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही आज मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा होत आहे.

हे वाचलं का?

मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा वाजण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात ही भोंगे उतरवण्याची मागणी केली होती.

पाहा राज ठाकरे यांची सभा LIVE:

राज ठाकरे यांनी मुंबईनंतर ठाण्यात सभा घेतली होती. ज्यात भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. या अल्टिमेटला आता २ दिवसच शिल्लक असून, त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होत आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलणार की मूळची शिवसेनेची मागणी असलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या नामांतर करण्याचा मुद्दा उचलणार हे पाहावं लागणार आहे.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा अजेंड्यावर घेतल्यानंतर राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या बाजूने झुकल्याची चर्चा केली जात आहे. औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पुरोहितांचे आशीवार्द घेतले होते. त्याचबरोबर वढू बुद्रूक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शनही त्यांनी घेतलं. त्यातून त्यांनी संभाजीनगर आणि हिंदूत्व या दोन्ही गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

तेच मैदान…

१९८८ साली झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना राजकारणात उतरली. यावेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. त्यामुळेच या मैदानाला शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्व आहे. आज याचं मैदानावर आज राज ठाकरे सभा घेत आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. जालना-औरंगाबाद राज्य राखीव सुरक्षा दल कॅम्पमधील एकूण ६०० जवान आणि शहर पोलीस दलातील ११०० कर्मचारी आणि सर्व अधिकारी मिळून १९२५ पोलिसांचा सभेसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

भाजपची ‘बुस्टर डोस’ सभा

दरम्यान, मुंबईतही भाजपची सभा होत आहे. गेल्या काही काळापासून भाजपकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जात आहे. यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. या सभेचा टीझरही आला असून, त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आलेला आहे. सोमय्या मैदानावर होत असलेल्या या सभेत फडणवीस कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

‘सभेच्या दिवशी आम्ही कोणीही साहेबांच्या…’, शर्मिला ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंविषयी ‘हा’ किस्सा

    follow whatsapp