मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र येऊन आपल्या पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली. ही युती मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी आहे. यावेळी मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. गेल्या कित्येक वर्षांपासून दूर असलेले हे चुलत भाऊ आज एकत्र आले, ज्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर नवे समीकरण उभे राहिले आहे.
ADVERTISEMENT
युतीची पार्श्वभूमी आणि इतिहास
2012 साली बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेना-मनसे हे राजकीय वैर कायम राहिले. मात्र, अलीकडील काळात परिस्थिती बदलली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद गमावले, तर मनसेही कमकुवत झाली. 5 जुलै 2025 रोजी वरळी मैदानावर 'आवाज मराठीचा' मेळाव्यात दोघे एकत्र आले, आणि 27 जुलै रोजी उद्धव यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी मातोश्रीवर भेट घेतली होती. महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी स्वतःहून युतीसाठी हात पुढे केला होता.
त्यानतंर आज युतीची अधिकृत घोषणा करताना राज ठाकरे म्हणाले की, "शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो. माझ्या एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली."
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या मनातला 'तो' क्षण, राज-उद्धव यांची युती जाहीर!
त्यांनी राज्यातील लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आणि राजकीय पक्षातील नेते पळवणाऱ्या टोळ्यांवर टीका केली. "जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू," असेही ते म्हणाले.
तर यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजप मुंबईचे लचके तोडायचा प्रयत्न करत आहे. भांडण सुरू राहिल्यास संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. ही युती कर्तव्य म्हणून एकत्र आली आहे आणि एकत्र राहण्यासाठी आहे."
हे ही वाचा>> आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!
यावेळी त्यांनी मराठी माणसाला आवाहन केलं की, 'चुकाल तर संपाल, मराठीचा वसा टाकू नका.' असं म्हणत विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा "कटेंगे तो बटेंगे" अपप्रचारही सांगितला.
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या दिवसाला ऐतिहासिक म्हटले आणि म्हणाले, "मराठी माणसासाठी हा आनंदाचा दिवस आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यांसह इतर महानगरपालिकांमध्ये युती असेल."
जागावाटप आणि इतर करार
शिवसेना-मनसे युती मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढेल. तसंच इतर ठिकाणी युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
जागावाटपाचे सूत्र अंतिम झाले आहे, पण विशिष्ट आकडे जाहीर करण्यात आले नाहीत. उमेदवारांना अर्ज भरण्याची माहिती लवकरच दिली जाईल. दरम्यान यावेळी राज ठाकरे असंही म्हणाले की, 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.'
इतर पक्षांकडून अद्याप मोठ्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत, पण युतीमुळे महायुतीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात नवे अध्याय सुरू करेल, आणि आगामी निवडणुकांमध्ये (29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान) तिचा प्रभाव दिसेल.
ADVERTISEMENT











