मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (24 डिसेंबर) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना एक खळबळ उडवून देणारा दावा केला. फडणवीस यांनी 'अल्लाह हाफीज' असं म्हटलंय आणि त्याचा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे. असा दावा राज ठाकरेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले, ज्यात दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या युतीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले असून, फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंचा दावा आणि पत्रकार परिषदेचा संदर्भ
आज दुपारी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ देत मनसेआणि शिवसेना UBT च्या युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) अल्लाह हाफीज बोलले, माझ्याकडे असंख्य व्हिडीओ आहेत. ट्रेलर नव्हे, संपूर्ण पिक्चर दाखवणार."
हे ही वाचा>> 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हे विधान फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टीका करणारे असून, राज ठाकरेंनी फडणवीस यांना 'बेगडी हिंदुत्व' असल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे सांगितले की, फडणवीस यांचा हा व्हिडिओ ते लवकरच जाहीर करतील आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चा आणखी तीव्र होईल.
राज ठाकरेंच्या या आरोपाने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर मुस्लिम समाजाशी संबंधित कार्यक्रमात 'अल्लाह हाफीज' म्हणण्याचा आरोप केला, ज्यामुळे भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
देवेंद्र फडणवीस खरंच 'अल्लाह हाफीज' म्हणालेले?
मनसे नेते गजानन काळे यांनी यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे 'अल्लाह हाफीज' म्हणाल्याचं दिसत आहे. अल्लाह हाफीज हा शब्द त्यांनी 2018 मध्ये वापरला होता. हे प्रकरण 5 नोव्हेंबर 2018 चे आहे, जेव्हा फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते मुंबईतील 'हाजी अराफत सूफी मखमली पीर कॉन्फरन्स' या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी भाषण केले होते आणि भाषणाच्या शेवटी ते म्हणालेले, "जय हिंद, अल्लाह हाफीज, जय भारत."
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो...', युती होताच राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान
हे भाषण सूफी परंपरेशी संबंधित कार्यक्रमात होते, ज्यात मुस्लिम समाजातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस यांनी या कार्यक्रमात सूफी परंपरेचे महत्त्व सांगितले आणि शांतता व एकतेचा संदेश दिला होता. भाषणाच्या शेवटी 'अल्लाह हाफीज' हा मुस्लिम अभिवादनाचा शब्द वापरून त्यांनी भाषण संपवलं होत.
या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असून, तो 5 नोव्हेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये फडणवीस यांचे भाषण दाखवण्यात आले असून, त्यात त्यांचा कार्यक्रमातील सहभाग दिसतो.
घटनेचा पार्श्वभूमी आणि राजकीय संदर्भ
2018 मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि भाजप-शिवसेना युतीचे सरकार चालवत होते. सूफी कॉन्फरन्स हा मुस्लिम समाजातील एक महत्त्वाचा कार्यक्रम असून, त्यात सूफी परंपरेच्या प्रसार आणि शांततेच्या संदेशावर भर दिला जातो. फडणवीस यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन मुस्लिम समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आजच्या राजकीय संदर्भात हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे, कारण राज ठाकरेंनी फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टीका केली आहे.
राज ठाकरेंनी केलेल्या या दाव्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अख्या दुनियेला माहितीय देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झालाय."
राज ठाकरेंच्या या दाव्यामुळे आता महापालिका निवडणुकांमधील प्रचार तापण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू असून तो आता व्हायरल झाला असून, अनेकांनी 2018 च्या व्हिडिओची लिंक शेअर केल्या आहेत.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेला आजचा दावा हा आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ठाकरे बंधूंची युती ही भाजपविरोधी आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हे देखील स्पष्ट केलं की, "मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार."
ADVERTISEMENT











