Raj-Uddhav Thackeray: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो...', युती होताच राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान
Mumbai Mayor: राज आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना (UBT)पक्षाच्या युतीची घोषणा केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी महापौर पदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र येऊन आपल्या पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली. ही युती मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी आहे. यावेळी मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. गेल्या कित्येक वर्षांपासून दूर असलेले हे चुलत भाऊ आज एकत्र आले, ज्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर नवे समीकरण उभे राहिले आहे.
युतीची पार्श्वभूमी आणि इतिहास
2012 साली बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेना-मनसे हे राजकीय वैर कायम राहिले. मात्र, अलीकडील काळात परिस्थिती बदलली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद गमावले, तर मनसेही कमकुवत झाली. 5 जुलै 2025 रोजी वरळी मैदानावर 'आवाज मराठीचा' मेळाव्यात दोघे एकत्र आले, आणि 27 जुलै रोजी उद्धव यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी मातोश्रीवर भेट घेतली होती. महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी स्वतःहून युतीसाठी हात पुढे केला होता.
त्यानतंर आज युतीची अधिकृत घोषणा करताना राज ठाकरे म्हणाले की, "शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो. माझ्या एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली."
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या मनातला 'तो' क्षण, राज-उद्धव यांची युती जाहीर!
त्यांनी राज्यातील लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आणि राजकीय पक्षातील नेते पळवणाऱ्या टोळ्यांवर टीका केली. "जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू," असेही ते म्हणाले.










